मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा उत्साह सर्वच स्तरांवर ओसंडून वाहात असताना शासकीय कारभाऱ्यांच्या अतिउत्साहाने मात्र शिक्षक बेजार झाले आहेत. कुठे घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी निधी कमी पडला म्हणून स्थानिक प्रशासनाने शिक्षकांकडून पाचशे रुपयांची वर्गणी गोळा करण्याचा घाट घातला आहे. मुळातच शिकवायचे, अभियाने राबवायची, अहवाल पाठवायचे की प्रशिक्षणांना हजेरी लावायची या पेचात असलेले शिक्षक सुट्टीच्या दिवशीच उपक्रम घेण्याची पत्रे आणि नंतर ती रद्द करण्याची घाई यांमुळे मेटाकुटीला आले आहेत.
सुट्टीच्या दिवशी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे फर्मान शिक्षण विभागाने काढल्यानंतर विद्यार्थी जमवताना शिक्षकांची मंगळवारी दमछाक झाली. एकाचवेळी, सकाळी ११ वाजता राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी शाळांना सोमवारी रात्री उशीरा पत्रक देण्यात आले. मात्र, शाळांना मंगळवारी मोहोरमची सुट्टी होती. त्यामुळे उपक्रम राबवा, छायाचित्र पाठवा याच्या अंमलबजावणीसाठी सुट्टीच्या दिवशी शिक्षकांना विद्यार्थी गोळा करावे लागले. त्यानंतर सुट्टीमुळे उपक्रम रद्द केल्याचे पत्र मंगळवारी दुपारी शाळांना पाठवण्यात आले. या पत्राच्या गोंधळातून शिक्षक बाहेर पडतात तोच मंगळवारी सायंकाळी दोन दिवसांनी, सुट्टीच्या दिवशीही प्रभातफेरी काढण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे. गुरुवारी (११ ऑगस्ट) शाळांनी प्रभात फेरी काढण्याची सूचना देण्यात आली आहे. या दिवशी राखीपौर्णिमा, नारळीपौर्णिमा आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यांमध्ये त्याची सुट्टी देण्यात आली आहे.
शिक्षकांच्या निधीतून झेंडा..
प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेकडे या अभियानाची जबाबदारी आहे. मात्र घरोघरी झेंडे वाटण्यासाठी निधी कुठून आणायचा असा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर उभा राहिला आणि प्रशासनाचे लक्ष शिक्षकांकडे गेले. यवतमाळ जिल्हापरिषदेने प्रत्येक शिक्षकांना या उपक्रमासाठी ५०० रुपये वर्गणी देण्याचे फर्मान काढले आहे. यवतमाळ येथील एका भागातील अधिकाऱ्यांनी घरोघरी तिरंगा अभियानासाठी एक हजार रुपये निधी शिक्षकांकडे मागितला. त्याविरोधात शिक्षकांनी संघटनांकडे तक्रार केली. संघटनांनी अधिकाऱ्यांसमोर विषय मांडला असता पाचशे रुपये गोळा करण्याचे पत्रक काढण्यात आले, अशी माहिती शिक्षकांनी दिली.
..विरोध अभियानासाठी नाही
एखादे अभियान राबवायचे तर स्थानिक प्रशासने त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत उघड विरोध केल्यास देशद्रोही ठरवले जाते. आम्ही निधि दिला तर देशावर प्रेम किंवा देशावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी असा निधी का द्यावा? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला.