मुंबई : इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पेपरच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम परीक्षा संपेपर्यंत अंतिम टप्प्यात येते. मात्र यंदा पेपर वाटपाच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने घातलेल्या घोळामुळे अद्यापपर्यंत मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका परीक्षकांपर्यंत पोहचल्या नसल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. तसेच शिक्षकांकडे पाठविण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या किती आहे, याबाबत राज्य मंडळाकडून व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती मागवल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इयत्ता १२ वीचा मराठी विषयाची परीक्षा १३ फेब्रुवारी रोजी झाली. इयत्ता १२ वीची परीक्षा संपण्यापूर्वी पहिला पेपरच्या तपासणीचे काम साधारणत: अंतिम टप्प्यात येते. मात्र यावर्षी पेपर वाटपाची जबाबदारी दिलेल्या एका अधिकाऱ्याने घातलेल्या गोंधळामुळे परीक्षा संपत आली तरी मराठीची उत्तरपत्रिका परीक्षकांकडे तपासण्यासाठी पोहोचलीच नाही. उत्तरपत्रिकेचे विभाजन करताना कोणतेही नियोजन न करता विषम पद्धतीने त्याचे वाटप केल्याने काही नियामकांकडे कमी तर काहीजणांकडे जास्त उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या. राज्य मंडळाकडून नियामकांकडे उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या तरी त्यांना परीक्षकांची माहिती देण्यात आली नाही. तसेच नियामक आणि परीक्षक हे परस्परांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने परीक्षकांपर्यंत उत्तरपत्रिका उशीरा पोहचल्या, तर काही परीक्षकांकडे उत्तरपत्रिका पोहचल्याच नाहीत. परिणामी, उत्तरपत्रिका तपासणीत खंड पडला. परीक्षकांकडे उत्तरपत्रिका पोहचल्याच नसतानाही ४ मार्च रोजी सर्व नियामकांना मराठीची उत्तरपत्रिका विभागीय कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेश राज्य मंडळाकडून देण्यात आले. त्यामुळे घाईघाईमध्ये उत्तरपत्रिका तपासण्याची टांगती तलवार परीक्षकांवर कोसळली. घाईघाईमध्ये उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

उत्तरपत्रिकेचे वाटप करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने घातलेला गोंधळ निस्तरण्यासाठी राज्य मंडळाने प्रत्येक नियामकाकडे किती उत्तरपत्रिका पाठविल्या, याची माहिती मागविली. ही माहिती उत्तरपत्रिकेसंदर्भातील शंकाचे निरसन करण्यासाठी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात यावी, अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत. यामुळे मंडळाकडून उत्तरपत्रिकांचे वाटप करताना नोंदी ठेवण्यात आल्या नाही का ? असा प्रश्न उपस्थित करत राज्य मंडळाच्या गोंधळाबाबत शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी विषयाची उत्तरपत्रिका सर्व परीक्षकांकडे वेळेत पोहोचल्या असून, त्या तपासणीचे काम सुरू आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणआहे का याची माहिती घेण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका नियामकांकडे पाठविताना त्याच्या नोंदी विभागीय कार्यालयाकडून घेतल्या जातात. त्यामुळे अशी कोणतीही माहिती मागवण्यात आली नाही. – ज्योत्सा शिंदे – पवार, प्र.विभागीय सचिव, राज्य मंडळ, मुंबई</strong>