लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सहा उपनगरीय रूग्णालयांमध्ये डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम (डीएनबी) अभ्यासक्रमासाठी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे.

महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अर्ज उपलब्ध आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे नियमित कामाव्यतिरिक्त अवघड, गुतांगुतीच्या व दुर्मिळ शस्त्रक्रिया व उपचार नागरिकांना मिळू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा… तरुणांनी संशोधन कार्यावर भर द्यावा- चंद्रकांत पाटील

सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी, वैद्यकीय महाविद्यालये आणि उपनगरांमधील रुग्णालयांमध्ये अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध व्हावेत, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अतिरिक्त शिक्षकवर्ग मिळावेत म्हणून उपनगरीय रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा भाग असणारा ‘डीएनबी’ अभ्यासक्रम यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे. डीएनबी’ हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी ८२ पदे असून यानुसार ३ वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीत २४६ विद्यार्थी उपलब्ध होऊ शकणार आहेत, अशी माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

या रूग्णालयांमध्ये होणार भरती

या भरतीअंतर्गत वैद्यकीय शिक्षकांची ३४ आणि इतर ८ अशी एकूण ४२ पदे भरण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरातील कुर्ला (पश्चिम) परिसरातील खान बहादूर भाभा सर्वोपचार रूग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात १, जनरल मेडिसिन विभागात ३ पदे, यानुसार ४ पदे भरण्यात येणार आहेत.

घाटकोपर परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनाजी अमीदास व्होरा सर्वोपचार रूग्णालय राजावाडी येथे रेडिऑलॉजी विभागात २, कान, नाक आणि घसा विभागात १, ॲनॅस्थेसिओलॉजी विभागात १, जनरल सर्जरी विभागात १, अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.

पश्चिम उपनगरातील कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रूग्णालयातील पेडीॲट्रीक विभागात १, स्कीन ॲण्ड व्ही. डी. विभागात २ आणि ॲनॅस्थेसिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.

वांद्रे (पश्चिम) येथील खुरशादजी बेहरामजी भाभा सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात २, पेडीॲट्रीक विभागात २, ॲनॅस्थेसिओलॉजी विभागात २, रेडिऑलॉजी विभागात २, पॅथॉलॉजी विभागात १ आणि कान, नाक, घसा विभागात १ अशी एकूण १२ पदे भरण्यात येणार आहेत.

गोवंडी परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी सर्वोपचार रूग्णालयात जनरल मेडिसिन १, ॲनॅस्थेसिओलॉजी आणि रेडिओलॉजी विभागात २, अशी एकूण ३ पदे भरली जाणार आहेत.

सांताक्रुझ परिसरातील विष्णूप्रसाद नंदराय देसाई सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात १, तर रेडिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच याच रूग्णालयांमध्ये शिक्षकांशिवाय इतर ८ पदे देखील भरण्यात येणार आहेत.

उपनगरीय रुग्णालयात ऑडीओमॅट्री, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग (आयपीसीयू), इ विभाग नव्याने सुरू करण्यात आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) येथे डायलेसिस कक्ष डीएनबी शिक्षकांच्या सहाकार्याने महानगरपालिकेतर्फे चालविण्यात येत आहेत. तसेच कर्णबधिर रुग्णांवर उपचार म्हणून कॉकलिअर इमल्पांट शस्त्रक्रिया उपनगरीय रुग्णालयांत केल्या जातात. तसेच २०० हून अधिक रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान करणे इत्यादी बाबी या अभ्यासक्रमातील तज्ज्ञ शिक्षकांमुळे सुलभ झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers will be recruited for diplomate of national board program dnb course in six suburban hospitals of bmc mumbai print news dvr
Show comments