टी २० विश्वचषक स्पर्धेत अविस्मरणीय असा विजय संपादित करणाऱ्या टीम इंडियाचं गुरुवारी मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या मार्गावर टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी संपूर्ण मरीन ड्राईव्हवर हजारोंच्या संख्येनं मुंबईकरांनी गर्दी केली होती. यानंतर वानखेडे स्टेडियमवर हजारोंच्या उपस्थितीत टीम इंडियातील खेळाडूंचा मोठा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या गर्दीचेही फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असताना मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

गुरुवारच्या विजयी मिरवणुकीत टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं मुंबईकर मरीन ड्राईव्हवर उपस्थित होते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येनं गर्दी जमा झाल्यामुळे काही लोकांना श्वास कोंडल्याचा त्रास झाल्याचं आता समोर आलं आहे. तसेच, काहींची प्रकृतीही अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावं लागलं. त्यामुळे एकीकडे गर्दीमध्ये आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंच्या स्वागताचा उत्साह दिसत असताना दुसरीकडे गर्दीमुळे काही प्रश्नही निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

Video: विजयी मिरवणुकीदरम्यान ‘ते’ दृश्य पाहून भारतीय क्रिकेटपटूंना बसला धक्का; विराटनं रोहितला सांगितलं आणि…

या गर्दीचा उल्लेख करत काहींनी मुंबईतील गर्दी नियोजनाचा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, उत्साहाच्या भरात आरोग्यावर बेतणारं वर्तन झाल्याचीही टीका काहींनी केली. तसे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, असं असताना मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एक व्हिडीओ शेअर करत मुंबईकरांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ मरीन ड्राईव्हवरच्या गर्दीचा असून बाजूच्याच एका इमारतीच्या छतावरून काढल्याचं दिसत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

“सायरन बजता गया, रास्ता बनता गया..मुंबईकरांना सलाम”, असं पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासह त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक रुग्णवाहिका मरीन ड्राईव्हवरच्या प्रचंड गर्दीतून वाट काढत निघाल्याचं दिसत आहे. पण यासासाठी तिथल्या गर्दीनंच रुग्णवाहिकेला रस्ता करून दिल्याचं पाहायला मिळत आहे. जसजशी रुग्णवाहिका पुढे जात होती, तसतशी समोरची गर्दी बाजूला होऊन वाट तयार होत होती. अखेर गर्दीनं रुग्णवाहिकेला वाट करून दिली आणि ती रुग्णालयाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

मरीन ड्राईव्हवरील विजयी मिरवणुकीनंतर तिथे मोठ्या प्रमाणावर चपलांचा खच पडल्याचं चित्रही दिसून आलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india welcome rally mumbai marine drive crowed video pmw