मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर करणारा हास्य कलाकार कुणाल कामराच्या माहिम येथील घरी सोमवारी मुंबई पोलिसांचे पथक गेले होते. पोलिसांनी कामराला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले होते. पण तो अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे पोलीस पथक सोमवारी कामराच्या घरी पाहणी करण्यासाठी गेले होते. कामरा विरोधात खार पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.

कामराला मुंबई पोलिसांनी दुसरे समन्स पाठवले होते. त्यात त्याला सोमवारी खार पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण तो अनुपस्थित राहिल्यामुळे पोलीस पथकाने माहिम येथील त्याच्या वडिलांच्या घरी जाऊन पाहणी केली. यापूर्वी याच ठिकाणी पोलिसांनी दोन समन्स बजावले होते.

एकूण चार गुन्हे

कामरा विरोधात खार पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्यातील तीन गुन्हे नाशिक ग्रामीण, जळगाव व नाशिक (नांदगाव) येथून वर्ग करण्यात आले आहे. मनमाड येथील शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख मयुर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यात कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केल्याचा आरोप आहे. याशिवाय जळगावचे शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख संजय दिगंबर भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरणही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

नाशिक नांदगाव येथील सुनील शंकर जाधव यांच्या तक्रारीप्रकरणी दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या तीन प्रकरणांसह शिवसेना नेते मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास आता एकत्रित करण्यात येणार आहे. सर्व गुन्हे खार येथील कार्यक्रमातील कामराच्या विडंबनात्मक गाण्याबद्दल आहेत. ही घटना खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ते सर्व गुन्हे खार पोलिसांना वर्ग करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी कामराने अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने कामराला अंतरिम दिलासा दिला होता.