मुंबई : आयुष्याच्या प्रवासात शाळा आणि महाविद्यालयामध्ये मित्रमंडळींशी आपले अनोखे घट्ट नाते तयार होते. त्यात ‘बॅकबेंचर्स’  असल्यावर आठवणींचा खजिनाच तयार होती. परंतु  शाळा आणि महाविद्यालयानंतर अनेकांच्या वाटा वेगळ्या होतात, मात्र ‘रियुनियन’चा प्लॅन झाल्यानंतर धावतपळत सगळे एकत्र जमतात आणि मनसोक्त मजामस्ती करतात. सध्या जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनची एक ध्वनिचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे. त्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’,‘आगीतून फुफाट्यात’,‘धरलं तर चावतंय सोडलं; तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींतून बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख करून देण्यात आली आहे. या म्हणींची भानगड आणि त्यामागची गंमत ही ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या नवीन मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार असून २८ फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा धमाल टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाच्या नावातूनच आपले वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाचे लक्षवेधी पोस्टर हे काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यानंतर आता चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमध्ये पार्टीतला गोंधळ तसेच मजामस्ती आणि स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे अशा कलाकारांची जमून आलेली उत्तम भट्टी काहीतरी धमाल घडवणार याचे संकेत देत आहे. त्याचबरोबर नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर आदी कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत.

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पटकथा आणि प्रजाकार प्रॉडक्शन्स यांच्या सहयोगाने तयार झालेल्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचे आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन – रोहन यांचे आहे.