मुंबई : टाटा पॉवरच्या विद्युत उपकेंद्रातील रोहित्रामध्ये सोमवारी रात्री बिघाड झाल्यामुळे भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मंगळवारी दिवसभर पश्चिम उपनगरे आणि शहरामधील काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. दहिसर, कांदिवली भागात विलंबाने पाणीपुरवठा झाला. दरम्यान, या भागातील पाणीपुरवठा बुधवारी पूर्ववत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव ५० टक्के भरलेले असले तरी सोमवारी रात्रीपासून पश्चिम उपनगरांमधील अनेक भागांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.
मंगळवारी काही भागात नियमित वेळेपेक्षा उशीरा पाणीपुरवठा झाला. टाटा पॉवरच्या कामशेत आणि साळशेत येथील विद्युत उपकेद्रातील रोहित्रांमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास अचानक बिघड झाला. त्याचा फटका मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला बसला. जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युतपुरवठा तासाभरात सुरळीत झाला. मात्र त्याचा परिणाम जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेवर झाला.
वैतरणा जलवाहिनीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याला त्याचा फटका बसला. त्यामुळे दहिसर पश्चिम भागात सोमवारी रात्री पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मात्र या भागातील पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत करण्याचे प्रयत्न जल अभियंता विभागाकडून मंगळवारी सुरू होते. या भागात मंगळवारी विलंबाने पाणीपुरवठा झाला. तसेच केवळ ५ ते १० टक्के कमी पुरवठा होऊ शकला. ही यंत्रणा पूर्ववत होण्यास आणखी काही कालावधी लागणार असून बुधवारी पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.