कोकण रेल्वेमार्गावर मालगाडी रखडल्याने या मार्गावरील वाहतूक अनिश्चित काळापर्यंत उशिराने सुरू असतानाच उपनगरीय प्रवाशांच्या वाटय़ालाही दिरंगाईचा अध्याय लिहिला होता. मध्य आणि पश्चिम या दोनही मार्गावर मंगळवारी वाहतूक उशिरानेच सुरू होती. या दोन्ही मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रक कोलमडल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
मध्य रेल्वेवर सकाळी साडेआठच्या सुमारास शीव आणि माटुंगा या स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरील दोन सिग्नलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बेंगळुरूला जाणारी उद्यान एक्स्प्रेस रखडली. या गाडीच्या मागोमाग असलेल्या सर्व जलद गाडय़ा रखडल्या. ही गाडी तब्बल १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने त्यापुढील अप गाडय़ांची वाहतूकही उशिरानेच सुरू झाली. परिणामी त्याचा फटका मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सात जलद गाडय़ांना बसला. या बिघाडामुळे दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. या दरम्यान अप जलद मार्गावरील वाहतूक अर्धा तास व अप धीम्या मार्गावरील वाहतूक १५-२० मिनिटे उशिराने होती. संध्याकाळी ही वाहतूक पूर्ववत होत असतानाच विद्याविहार स्थानकाजवळ डाऊन जलद मार्गावरील ओव्हरहेड वायरने पेट घेतल्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या सर्व जलद गाडय़ा रखडल्या. या गाडय़ा डाऊन धीम्या मार्गावरून पुढे काढण्यात आल्याने डाऊन धीम्या मार्गाची वाहतूकही विस्कळीत झाली. याचा फटका रात्री उशिरापर्यंतच्या गाडय़ांना बसला. पश्चिम रेल्वेमार्गावरही सकाळी माहीमजवळ जलद मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील जलद तसेच धीम्या गाडय़ांची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती, तर संध्याकाळी ग्रँट रोड आणि चर्नीरोड या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली.

Story img Loader