चर्नी रोड स्थानकातील विनयभंग घटनेच्या वेळी लोकलच्या महिलांच्या डब्यात लोहमार्ग पोलीस नसण्यास तांत्रिक बिघाड जबाबदार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. बोरिवली-कांदिवली स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे लोहमार्ग पोलीसांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. तसेच लोहमार्ग पोलिसांच्या तुटपुंज्या संख्येमुळे बदली कर्मचारी देता आला नाही. परिणामी काही गाडय़ांच्या महिलांच्या डब्यात पोलीस कर्मचारी नव्हते, असेही स्पष्ट करण्यात आले.
गुरुवारी रात्री बोरिवलीहून ८.५६ वाजता चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये मालाडला पीडित तरुणी चढली. ही गाडी दहाच्या सुमारास चर्चगेट स्थानकात पोहोचणे अपेक्षित होते; मात्र सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे ती पोहोचण्यास दीड तासांचा विलंब झाला. त्यामुळे या तरुणीचा विनयभंग होण्याची घटना रात्री अकरानंतर घडली. नियमानुसार रात्री ८.३० नंतर सुटणाऱ्या गाडीच्या महिलांच्या प्रत्येक डब्यात लोहमार्ग पोलीस कर्मचारी असणे अपेक्षित आहे.
मात्र, लोहमार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार गुरुवार रात्री या बिघाडामुळे बोरिवलीला कामावर जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही विलंब झाला. तसेच राखीव कुमकेपैकी जास्त कर्मचारी गर्दीच्या दिशेला पाठवण्यात आले. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या महिलांच्या डब्यात पोलीस कर्मचारी नव्हते. आता लोहमार्ग पोलीस ही चूक सुधारण्यासाठी एक नवीन आराखडा तयार करत आहेत. या सुरक्षाविषयक नव्या आराखडय़ाबद्दल रेल्वे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी एक बैठकही झाली.
रात्री ८.३० नंतर पोलीस कर्मचारी नसेल आणि त्या डब्यात जास्त महिला सहप्रवासी नसतील, तर महिलांनी राखीव डब्यातून प्रवास करू नये. तसेच त्या डब्यात एकटीदुकटी महिला चढलीच, तर तिने तातडीने लोहमार्ग पोलिसांच्या ९८३३३१२२२२ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवावा. यात तिने तिची गाडी कुठे आहे, ती कोणत्या डब्यात आहे याची माहिती द्यावी. त्यानुसार डब्यात कर्मचारी पाठवला जाईल.