लाखो प्रवाशांचा भार दर दिवशी वाहणाऱ्या मध्य रेल्वेला सध्या ‘तांत्रिका’ने झपाटले आहे. दर आठवडय़ात किमान दोन दिवस तरी या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत होते. गुरुवारीही या गोष्टीचे प्रत्यंतर मध्य रेल्वेवरील प्रवाशांना आले. गुरुवारी दुपारी नेरळजवळ एका मालगाडीत बिघाड झाल्याने दुपारपासूनच उपनगरीय गाडय़ा उशिराने धावण्यास सुरुवात झाली. नंतर सायंकाळी कळव्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची सेवा ऐन गर्दीच्या वेळी कोलमडली.
नेरळजवळ मालगाडीच्या एका डब्यात गुरुवारी दुपारी बिघाड झाला. दुपारी २.०५ वाजता हा बिघाड लक्षात आल्यानंतर ही गाडी नेरळलाच थांबवून ठेवण्यात आली. मात्र यामुळे या गाडीच्या मागून येणाऱ्या एका उपनगरीय गाडीला त्याचा फटका बसला आणि ही गाडी दिरंगाईने धावत होती. या मालगाडीतील बिघाड २.५५ वाजता दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर ही गाडी पुढे निघाली.
सायंकाळी चार वाजता कळव्याजवळ कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला.
हा बिघाड दुरुस्त होण्यास तब्बल दीड तासांचा कालावधी लागला. या दरम्यान ठाण्यापासून पुढे डाऊन धीम्या मार्गावरून जाणाऱ्या तीन अर्धजलद गाडय़ा जलद मार्गावरून चालवण्यात आल्या. या गाडय़ा ठाणे आणि दिवा या स्थानकांदरम्यान जलद होत्या. तसेच सात फेऱ्या रद्द करण्यात आल्या. हा बिघाड ऐन गर्दीच्या वेळीच झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
मध्य रेल्वेमार्गावरील हा तांत्रिक बिघाड नेहमीचाच झाला आहे. डीसी-एसी परिवर्तन, नवीन गाडय़ा वगैरेंच्या गप्पा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने आधी आहेत त्या सेवा वेळेत चालवण्यास शिकायला हवे, असे मत प्रवासी संघटनेचे प्रवक्ते नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा