‘दूरदर्शन’च्या तांत्रिक व्यत्ययाचा फटका बुधवारी राज्याच्या अर्थसंकल्पाच्या थेट प्रक्षेपणास बसला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचे भाषण सुरू करताच दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरील प्रक्षेपणात बिघाड झाला आणि पहिली पाच मिनिटे त्यांचा आवाजच प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही. आरंभीच सुरू झालेला तांत्रिक घोळ नंतरही कायम राहिला आणि संपूर्ण भाषणाच्या अवधीत अधूनमधून तांत्रिक बिघाडामुळे मुनगंटीवारांचे भाषण लोकांना नीट पाहता आले नाही. राज्याचा अर्थसंकल्प बुधवारी सादर झाला. दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरुन याचे थेट प्रसारण केले जात होते. अर्थमंत्री मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उभे राहिले. सन्माननीय विधानसभा अध्यक्ष व सदस्य, मी आता राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहे, अशी सुरुवात त्यांनी केली आणि पुढची काही मिनिटे ‘व्यत्यय’ आल्यामुळे मुनगंटीवार यांचे केवळ हलणारे ओठ व सभागृहातील दृश्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मुनगंटीवार यांचा ‘आवाज’ प्रेक्षकांना ऐकू येत नव्हता. हा प्रकार सुमारे तीन ते पाच मिनिटे सुरू राहिला होता. त्यानंतरही या प्रक्षेपणात अधूनमधून अडथळे येत होते. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या थेट प्रक्षेपणाचा विचका झाला.
या गंभीर प्रकाराची जबाबदारी दूरदर्शनच्या तांत्रिक विभागावर येते. अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रसारण सुरू होण्यापूर्वी संबंधितांनी सर्व व्यवस्था योग्य आहे की नाही याची खात्री करून घेतली होती का? ‘ऑडिओ केबल’ ची जोडणी व्यवस्थीत केली गेली होती की नाही? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
दरम्यान या संदर्भात मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक मुकेश शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता, घडलेल्या या प्रकाराबाबत आपण माहिती घेत आहोत. काही तांत्रिक कारणामुळे हा ‘व्यत्यय’ आला. हा प्रकार नेमका कशामुळे आणि का घडला याची चौकशी करू, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा