सामूहिक बलात्कार प्रकरणात तंत्रज्ञानाचा हत्यार म्हणून करण्यात आलेला वापर महिलावर्गाला कापरे भरवणारा आहे. बलात्कार करताना त्याचे मोबाईलवर चित्रण करून पोलिसांत तक्रार नोंदविल्यास याची चित्रफीत जारी करेन, ही धमकी दिली तर पीडित मुलगी पोलिसांत जाणार नाही, आपले काही वाकडे होणार नाही, असे त्या नराधमांना वाटणाऱ्या विश्वासाने महिलावर्ग हादरल्या आहेत.
सोशल नेटवर्किंग साइटस्वरच्या माहितीचा, फोटोंचा वाढता गैरवापर आणि त्याद्वारे धमकावून महिलांचे लैंगिक शोषण करण्याच्या वाढत्या प्रकारांनी स्त्रीवर्ग आधीच अस्वस्थ आहे. मॉलमध्ये ट्रायल रूममध्ये कपडे चेंज करताना त्या दहादा छुपे कॅमेरे तर नाहीत, याची दहादा खात्री करून घेतात, कामानिमित्त परगावच्या हॉटेलमध्ये उतरताना त्यांना खोलीत कॅमेरे असण्याची धास्ती वाटत राहते. रेल्वे फलाटावर किंवा पुरुषांसाठी महिलांचा डबा खुला झाल्यानंतर मोबाईलवर समोरचा पुरुष डब्यातील स्त्रियांचे उगीचच चित्रण करण्याची विकृत कृती करतो, हेही तिला जाणवत असते. इंटरनेटवर विशिष्ट साइटला भेट न देताही पोर्नोग्राफी सहजतेने उपलब्ध असते.. हे सर्व तंत्रज्ञान स्त्रीला खेळवण्याचे हत्यार म्हणून आज खुश्शाल वापरले जातेय. तिचे खासगीत्व चव्हाटय़ावर आणण्याचे साधन बनले आहे.
विकृतीचे लक्ष्य ठरलेली २२ वर्षांची ती मुलगी काय आणि तिच्यावर बलात्कार करणारे विशीतले विकृत तरुण काय, झाल्या घटनेने घराघरांतल्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या मुलांचं वय आणि त्याच वयातील आपली मुलं यांची ते कळत-नकळत तुलना करतायंत. इतकं घृणास्पद कृत्य करण्यास धजावणाऱ्या आणि नंतर तिला धमकवणाऱ्या या घटनेचा विचार करून त्यांचा मेंदू बधीर झालाय.
गेल्या काही वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये गुन्हेगाराचं कमी होत गेलेलं वय समाजमनाला अस्वस्थ करतंय. या गैरकृत्यांचा आणि तंत्रज्ञानाच्या अनिष्ट वापराचा थेट संबंध समाजशास्त्रज्ञ जोडू लागले आहेत.
‘अशा बलात्काराच्या वाढत्या घटना आणि त्यात अनैसर्गिक सेक्स करण्यात आल्याचे निष्पन्न होण्याचे वाढते प्रमाण याबाबत संबंधित तज्ज्ञांशी बोलताना ते म्हणाले की, ‘सेक्ससंदर्भातील ओव्हर एक्स्पोजर, पोर्नोग्राफी ही मुलांना वास्तवापासून दूर नेणारी असते. काहीतरी वेगळं आणि अधिक मिळवण्याचा हव्यास त्यांना जडू शकतो आणि मग एखादी तावडीत सापडली, की हवं ते करून घ्या, असा गुन्हेगारांचा दृष्टिकोन दिसून येतो.’ सामूहिक बलात्कार प्रकरणात त्या मुलीवर एकाने केलेला दोनदा बलात्कार यातूनही ही भीषणता व्यक्त होते.
गेल्या चार दिवसांतच मुंबईत महिला पत्रकारावर झालेला सामूहिक बलात्कार, पुण्यात पाचवीतील मुलीवर बलात्कार करून तिची करण्यात आलेली हत्या, विरारमध्ये तीन वर्षांच्या मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार, रसायनीमध्ये १३ वर्षांच्या मुलाने पाच वर्षांच्या मुलीवर केलेला बलात्कार, झारखंडमध्ये पोलीस महिलेवर डाकूंनी केलेला सामूहिक बलात्कार या सर्व घटना महिलावर्गाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. तिच्या अस्तित्वाशी खेळणाऱ्या या घटना नक्की कशा घडल्या आणि तेव्हा काय झालं, अशा डिटेल्समध्येच आपल्याला स्वारस्य आहे की अधिक संवेदनशीलतेने आणि ठामपणे आपण संबंधित मुद्दय़ांची तड लावणार आहोत का, हा प्रश्न उरतो.
‘हे कुणा महिलेच्या बाबतीत कधीही घडू शकतं,’ ही प्रत्येकीच्या मनात उमटलेली भावना तिच्या असुरक्षिततेला अधोरेखित करते. अवघ्या काही तासांत त्या नराधमांविरूद्ध जबाब नोंदविणाऱ्या आणि ‘पुन्हा जोमाने उभी राहीन,’ हा आत्मविश्वास दाखविणाऱ्या तिच्या लढाऊ बाण्याला प्रत्येकाने सलाम केला.. तिच्या या कृतीने पाशवी, विकृत वृत्तींविरूद्ध लढण्यासाठी प्रत्येकीला हत्तीचे बळ पुरवले. ते फक्त टिकावे, असंच प्रत्येकीला मनापासून वाटतंय. ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत,’ हा सहभाव तिला द्यावासा वाटतोय.. (समाप्त)
तंत्रज्ञानाचा स्त्रीविरोधात वाढता वापर धक्कादायक
सामूहिक बलात्कार प्रकरणात तंत्रज्ञानाचा हत्यार म्हणून करण्यात आलेला वापर महिलावर्गाला कापरे भरवणारा आहे.
First published on: 27-08-2013 at 05:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technology used against women is dangerous for society