‘तहलका’चे संस्थापक आणि माजी मुख्य संपादक तरूण तेजपाल यांच्याविरुद्ध विनयभंग आणि लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱया महिला पत्रकाराने सोमवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पीडित महिलेने सोमवारी दुपारी दोन वाजता आपला राजीनामा ई-मेलद्वारे ‘तहलका’च्या व्यवस्थापनाकडे पाठवून दिला. स्वतःवरील अत्याचाराच्या विरोधात उभे राहण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही या महिलेने व्यवस्थापनावर केला आहे. सूत्रांनी ही माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
तेजपाल यांचा अटकपूर्व जामीनासाठी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात अर्ज
गोव्यात झालेल्या ‘थिंक फेस्ट’वेळी तेजपाल यांनी विनयभंग आणि लैंगिक शोषण केल्याची तक्रार संबंधित महिला पत्रकाराने १८ नोव्हेंबर रोजी व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांच्याकडे केली होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला गोव्यामध्ये दोन वेळा विनयभंगाची घटना घडल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर तिच्यासोबत काम करणाऱया दोन सहकाऱयांनी गेल्या आठवड्यातच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर तहलकामध्ये स्तंभ लिहिणाऱया काही लेखकांनीही आपले करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.