तार खात्याच्या कर्मचाऱ्यांचा जुन्या स्मृतींना उजळा
‘हा एक कारखानाच होता.. कार्यालयात प्रवेश करताच शेकडो यंत्रांचा खडखडाट अंगावर यायचा.. दुसऱ्या मजल्यावर किमान पाचशे यंत्रांचा खडखडाट अन् तळ मजल्यावर बुकिंगची घाई.. चोवीस तास काम चालू असायचे.. एकमेकांशी बोलायलाही फुरसत नसायची. एकमेकांशी केवळ तीनच प्रश्नांची चर्चा व्हायची, डय़ुटी कोणती, सेक्शन कोणते आणि पोर्ट कोणते. बस बाकी सगळा खटखटाट.. ८० च्या आसपास मोर्सचा वापर कमी झाला, टेलीप्रिंटरचा वापर वाढला. आज एसीत बसत असलो तरी तेव्हा टेली प्रिंटरवरुन तार घेताना गम लावलेले पेपर उडू नयेत म्हणून पंखे बंद ठेवावे लागायचे. प्रत्येक टेलिग्राफिस्टला दिवसाला ११० तारा पाठवणे, ११० तारा घेणे इतके काम असायचे. जास्त काम केल्यावर प्रत्येक टेलीग्राम मागे एक पैसा इन्सेटिव्ह मिळायचा. १९८० नंतर तो चार पैसे झाला. मात्र कालौघात तो बंद करण्यात आला. काहीजण एका तासात १०० तारा पाठवायचे. चोवास तास काम केल्यानंतर त्यांना वेतनाइतकाच इन्सेटिव्ह मिळायचा. वेतन तुटपुंजेच होते. त्यामुळे संसाराला इन्सेटिव्हची जोड मिळायची.’
.. अनेक कुटुंबांच्या संसाराची लय सांभाळणारी ही तार आता कायमची बंद होणार या बातमीनंतर मुंबईच्या मध्यवर्ती तार केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या आठवणीचा जणू बांधच फुटला होता. प्रत्येक कर्मचारी जुन्या आठवणीत बुडून गेला होता, आणि त्याचबरोबर आता आम्हाला कोणत्या विभागात काम करायला लागणार याची चिंता देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
सार्थ अभिमान
आज ३५ वर्षे झाली तरी नोकरीला लागताच प्रशिक्षणादरम्यान शिकलेले मोर्सचे कोड अनेकांना व्यवस्थित आठवत होते. कोणाला शहरांचे कोड आजदेखील पाठ होते. रामदास जहाज बुडत असताना तारखात्यानेच तो संदेश नौदलास कसा पोहचवला, हवामान खात्याचे संदेश दररोज ठराविक वेळी आम्ही सर्व जहाजांना कसे पाठवायचो अशा अनेक प्रसंगातून तार खाते समाजाला कसे उपयोगी होते हे वर्णन करताना त्या कर्मचाऱ्यांचा उर अभिमानाने भरून येत होता. पण त्याचबरोबर आता तार बंद होणार हे कळल्यावरच्या भावना मात्र शब्दात मांडता येत नाही अशीच सार्वत्रिक प्रतिक्रिया होती.
.. तरीही काम भरपूर
पूर्वी दिसणारी लाखो तारांची भेंडोळी आता कमी झाली असली तरी कायदेशीर पुरावा म्हणून अनेक बँकाच्या नोटिसा आजदेखील तार खात्यामार्फत पाठवल्या जात असल्यामुळे आमच्याकडे काम भरपूर आहे आणि आम्ही ते करू शकतो हा विश्वास त्यांच्या बोलण्यात प्रकट होत होता. तंत्रज्ञानामुळे झालेले बदल येथील अनेकांनी स्वीकारले तर आहेत, पण तार बंद होणार म्हणून वाईट वाटत आहे. पण आमच्याकडे काम असताना निवृत्तीच्या उंबरठय़ावर असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आता कोणत्या खात्यात काम करावे लागेल, याच कार्यालयात राहणार की अन्य कोठे जाणार ही भावना डोकावत होती.

Story img Loader