मुंबई : मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील ठप्प झालेली दूरध्वनी व इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यासाठी अखेर महानगर टेलिफोन निगम लि. (एमटीएनएल) व्यवस्थापनाने जुन्या कंत्राटदाराला पुन्हा पाचारण केले. या कंत्राटदारामार्फत काही ठिकाणी ॲाप्टिकल फायबरमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबईतील घाटकोपर, कफ परेड तसेच नवी मुंबईतील दूरध्वनी सेवा पूर्ववत झाली, असा दावा करण्यात आला आहे.
एमटीएनएलची मुंबईसह ठाणे, नवी मुंबई येथील सेवा ठप्प झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. या वृत्तानंतर व्यवस्थापनाकडून त्याचा इन्कारही करण्यात आला नाही. यावर व्यवस्थापनाचे काही म्हणणे आहे का, याबाबत एमटीएनएलच्या जनसंपर्क विभागाला विचारले असता, त्यांच्याकडूनही नकारार्थी उत्तर मिळाले. एमटीएनएलची दुरवस्था झाली असून कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने किती काळ यंत्रणा सुरळीत ठेवणार, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे.
ज्या एनएमएस नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टिममुळे संपूर्ण एमटीएनएल नेटवर्कमधील दोष समजू शकतो ती यंत्रणाच कालबाह्य झाल्यामुळे व एमटीएनएलच्या विविध दूरध्वनी केंद्रातील ॲाप्टिकल फायबरच्या कमतरतेमुळे संपर्क यंत्रणा नसल्याने दोष समजणे व त्याची दुरुस्ती करणे कठीण झाले आहे, असे एका अभियंत्याने सांगितले.
यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीने काम केले आहे त्यांना दोन-तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्यांनी काम बंद केले. ऑप्टिकल फायबर जोडण्याचे यंत्र व ओटीडीआर (ॲाप्टिकल टाईम डोमेन रेप्लेक्टोमीटर) या यंत्रणेमुळे फायबरमध्ये किती अंतरावर दोष निर्माण झाला आहे हे समजते. पण ही यंत्रणा या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे असून त्यांनी काम बंद केल्यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील दूरध्वनी सेवा खंडित झाल्याचेही या अभियंत्याने सांगितले.
खंडित दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्याचे व्यवस्थापनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुदत संपलेल्या कंत्राटदारांना विनवणी केली जात आहे. याच कंत्राटदारांना आणखी वर्षभर मुदत वाढवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळते. याबाबत व्यवस्थापनाकडून काहीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.