७ वर्षांचा कारावास
कोटय़वधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याला सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने इंधन भेसळप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या निकालानंतर तेलगीविरुद्ध महाराष्ट्रात दाखल करण्यात आलेली तीनही प्रकरणे निकालात निघाली आहेत.
इंधन भेसळ प्रकरणात गेल्या डिसेंबर महिन्यातच तेलगीला दोषी ठरवण्यात आले होते. सोमवारी त्याला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. पोलिसांच्या दाव्यानुसार, मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान तेलगीने आपला इंधन भेसळ प्रकरणातही हात असल्याचे सांगितले होते. हे भेसळयुक्त इंधन महाराष्ट्रातील सर्वच पेट्रोल पंपांवर पुरवले जात होते. या इंधनात नाफ्ताची भेसळ करण्यात आली होती.
यात तेलगीसह इतर १४ आरोपींचा समावेश असून त्यातील तीन अद्यापही फरार आहेत. आरोपींमध्ये ठाणे पॉलीऑरगॅनिक कंपनीचाही समावेश असल्याची माहिती तेलगीविरुद्धचा खटला चालवणारे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

Story img Loader