मुंबई : मुंबईत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी असह्य उकाडा आणि उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. मंगळवारी दिलेल्या पूर्वमानानुसार बुधवारीदेखील मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार बुधवारी नागरिकांना उष्ण व दमट वातावरणाचा अनुभव आला. दरम्यान, बुधवारी पुन्हा राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात बुधवारी ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ५.७ अंशांनी अधिक होते. तसेच कुलाबा येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.सलग दुसऱ्या दिवशी सांताक्रूझ येथील तापमानाचा पारा ३८ अंशापार नोंदला गेला. बुधवारीदेखील राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे झाली.
सध्या पूर्वेकडून जोरदार वारे येत असल्याने तापमानात वाढ झाली आहे, मात्र गुरुवारपासून तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. मात्र, उष्ण व दमट वातावरण राहील. त्यानंतर पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता कमी असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
२० ते २६ फेब्रुवारीमधील नोंद
२५ फेब्रुवारी – ३८.७
२४ फेब्रुवारी – ३८.४
२३ फेब्रुवारी – ३७.२
२२ फेब्रुवारी – ३७.२
२१ फेब्रुवारी – ३७.३
२० फेब्रुवारी – ३६.३
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)