मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट होत आहे. त्यामुळे पहाटे किंचीत गारवा जाणवू लागला आहे. मात्र, दिवसभर पुन्हा उकाडा सहन करावा लागतो. दरम्यान, पुढील दोन दिवस कमाल तापमानातही काहीशी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेले अनेक दिवस मुंबईतील तापमानात चढ – उतार कायम आहे. यामुळे कधी गारवा, तर कधी उकाडा असे वातावरण असते. त्यातच मागील दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट झाली असली, तरी दिवसभराचे तापमान अधिक असल्यामुळे, तसेच ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईतील तापमानात घट होण्याचा अंदाज हवमान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३० – ३२ अंश , तर किमान तापामान १६ – १८ अंशादरम्यान राहील. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २८.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवर बुधवारच्या तुलनेत गुरुवारी काही अंशाने कमी तापमान नोंदले गेले.

हेही वाचा – पावसाळापूर्व कामांना आतापासूनच सुरुवात करावी, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश

हेही वाचा – जळगाव रेल्वे दुर्घटनेत नेपाळी नागरिकांचा मृत्यू

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. वायव्य भारतात १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांमुळे गारवा वाढू लागला आहे. यामुळे राज्याच्या किमान तापमानातही चढ – उतार होत आहे. मुंबईबरोबरच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात शुक्रवारपासून आकाश निरभ्र राहील, तसेच किमान तापमानात २ ते ३ अंशानी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature drop in mumbai mumbai print news ssb