राज्यभरात कडाका वाढला; नाशिक ७.५, नगर ५.६, पुणे ८.४, नागपूर ८.४
निश्चलनीकरणामुळे अभूतपूर्व चलनटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने सामान्यजनांचा सं-ताप वाढू लागलेला असतानाच थंडीच्या आगमनाने त्यांना सुखद धक्का मिळाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला थंडीचा प्रभाव पुन्हा वाढू लागला असून विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले आहे. पुण्यासह नागपूर, नगर, जळगाव, नाशिक, महाबळेश्वर, सातारा, सोलापूर या शहरांमधील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, शनिवारी सर्वात कमी तापमानाची नोंद नगर (५.६ अंश से.) येथे झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून, येत्या आठवडय़ात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीने बस्तान बसवले असून कोकण व गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात शनिवारी किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहिले. मुंबई शहर व उपनगरातही थंडीत वाढ झाली असून नोव्हेंबरमध्ये मुंबईचे तापमान १६.४ अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. परंतु, गेल्या २४ तासांत सांताक्रूझ येथे १५.७ अंश सेल्सिअस इतकी कमी नोंद करण्यात आली.
पावसाची शक्यता
१० ते १२ डिसेंबर यादरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी, १३ डिसेंबरला मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्यामुळे थंडीची तीव्रता कमी होईल. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण आणि गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होणार असून, या वादळामुळे राज्यात अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले होते.
महाबळेश्वर गोठले!
महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून शनिवारी येथील वेण्णा तला परिसरात मोठय़ा प्रमाणात दवबिंदू गोठल्याने सर्वत्र हिमकण पसरल्याचा भास होत होता. सलग सुट्टय़ांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली असून अनेकांनी या गोठलेल्या दवबिंदूंचा आनंद लुटला. नौकाविहारासाठी उभारण्यात आलेल्या जेटीवरही ठिकठिकाणी गोठलेले दवबिंदू साचल्याचे दृश्य होते. ते गोळा करण्याचा आनंद येथे आलेल्या पर्यटकांनी घेतला. दरम्यान, थंडीच्या हंगामात या वर्षी सलग दोन दिवस गोठलेले दवबिंदू दिसले, हे विशेष. हवामान खात्याच्या नोंदीनुसार शनिवारी महाबळेश्वरातील तापमान ११.०१ अंश सेल्सिअस होते. दरम्यान वेण्णा तलाव परिसरात तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसदरम्यान असावे, असा अंदाज पर्यटक वर्तवत होते.
उत्तर भारत गारठला
नवी दिल्ली : उत्तर भारतातही थंडीचा प्रभाव वाढला आहे. काश्मीर खोऱ्यातील तापमान या मोसमातील सर्वात नीचांकी होते. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच प्रसिद्ध दल सरोवर गोठले आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड येथेही थंडीचा कडाका वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.