मुंबई : मुंबई शहर तसेच उपनगरांत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा कायम आहे. मुंबईतील तापमान शुक्रवापर्यंत ३७ अंशांवर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवली आहे. मुंबईत शनिवारी हंगामातील सर्वोच्च ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ केंद्रात ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत जाणवला नसला तरी शहर आणि उपनगरातील तापमान वाढले आहे.
हेही वाचा >>> मुंबई : अपघातप्रकरणी बेस्टच्या चालकाला तीन महिन्यांची शिक्षा
तापमानासह आद्र्रतेचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईत सध्या सरासरी ७५ ते ८० टक्के आद्र्रतेची नोंद झाली आहे. उन्हाच्या वाढत्या झळा पाहता दुपारी बाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दिवसभर कडक ऊन आणि रात्री असह्य उकाडा, असे वातावरण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून आहे. आत्तापर्यंत २०२० मधील ऑक्टोबर हा गेल्या काही वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला होता. दरम्यान यंदाचे वर्ष २०२०पेक्षाही उष्ण ठरले आहे. दिवसाचे तापमान सरासरी ३३.५ ते ३६ अंशांवर गेले आहे. अरबी समुद्रातील तेज चक्रीवादळाचा हा परिणाम आहे.
एल निनोचा परिणाम
एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा ऑक्टोबर गेल्या दहा वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरण्याच्या मार्गावर आहे. यंदा मोसमी पावसाने पंधरा दिवस आधीच माघार घेतल्यामुळेही उन्हाचा तडाखा लवकर जाणवू लागला. ऑक्टोबरमधील सरासरी तापमान ३१.२ अंश सेल्सिअसवरून ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.