ऐन थंडीत पावसाच्या सरी अनुभवणाऱ्या मुंबईकरांना थंडीपासून किंचित मुक्तता मिळणार आहे. आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी शहराच्या किमान तापमानात अनुक्रमे १९ व २१ अशी वाढ होणार आहे. मात्र, थंडीपासून ही सुटका अल्पजीवीच ठरणार असून १८ व २१ फेब्रुवारीला उत्तरेत थंडीची लाट येणार आहे.
   पाऊस आणि त्यासोबत आलेले बोचरे वारे यांमुळे रविवारची पहाट अधिकच थंडगार झाली होती. हा कडाका रविवारी रात्रीही कायम होता. मात्र, असे असले तरी पुढील दोन दिवस तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यानंतर १८ व २१ फेब्रुवारी रोजी उत्तरेत थंडीची लाट येण्याची अपेक्षा असून वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून राहिल्यास मुंबईत पुन्हा गारवा परतण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी सांताक्रूझ येथे १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मात्र, पश्चिमी वाऱ्यांसोबत आलेली बोचरी थंडी पावसासोबतच पळाली असून दोन दिवस तापमानातही वाढ होणार आहे. आठवडाभर असलेला थंडीचा माहोल दोन दिवसांसाठी कमी होईल, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.