मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान हळूहळू कमी होऊन थंडीचे प्रमाण वाढत होते. मात्र, गुरुवारी रात्री पश्चिमी झंझावातामुळे समुद्रामधील तापमानात वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा वाढलेल्या तापमानाचा सामना करावा लागला.
शुक्रवारी सांताक्रूझ आणि कुलाबा येथील किमान तापमान अनुक्रमे १९.४ अंश आणि २०.८ अंश नोंदवण्यात आले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतील किमान तापमानात तीन अंशाने वाढ झाल्याची नोंद हवामान विभागाने केली. देशाच्या उत्तरेकडील भागात हिमवर्षांव आणि थंडी वाढत असून येथील शीत वाऱ्यांच्या प्रभावामुळे मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढत होता. मात्र, पश्चिमी झंझावातामुळे समुद्रातील पाण्याचे तापमान वाढले. तसेच, उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने शुक्रवारी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सांताक्रूझ येथील किमान तापमानात ३.१ अंशाने आणि कुलाबा येथील किमान तापमानात १.४ अंशाने वाढ झाल्याची नोंद हवामान विभागाने केली. तसेच, सांताक्रूझ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने आणि कुलाबा येथील किमान तापमान सरासरी एक अंशाने वाढले. दरम्यान, येत्या दोन दिवसांत तापमान पुन्हा कमी होण्याची शक्यता असून किमान तापमान १४ ते १६ अंशादरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी वर्तवला आहे.
वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याचा परिणाम
समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान गुरुवारी वाढल्याने समुद्राकडून जमिनीवर येणाऱ्या वाऱ्यांद्वारे उष्णता वाढली. त्यामुळे जमिनीवरील तापमानात वाढ झाली. तसेच, देशाच्या उत्तर आणि ईशान्येकडून दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने तापमान वाढले आहे. तर आता हवेच्या दाबात बदल होण्यास सुरुवात होणार असल्याने येत्या आठवडय़ापासून तापमनात पुन्हा वाढ होण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली.