राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढलेला असतानाच तापमानाचा पाराही हळूहळू चढू लागला आहे. राज्यात पारा चाळिशीपुढे झुकू लागलेला असतानाच मुंबईकर मात्र सुदैवी ठरले आहेत. शहरातील तापमान अजूनही तीसच्या घरात रेंगाळत असल्याने उन्हाचा तडाखा अद्याप जाणवलेला नाही. हवेतील हा गारवा मुंबईकरांना आणखी काही दिवस अनुभवायला मिळणार आहे.
एरवी एप्रिलमध्ये सरासरी तापमान ३३ अंश सेल्सिअस असते. मात्र, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. मुंबईत मात्र, अजूनही तापमान ३०च्या घरात आहे. सांताक्रुझ येथे तापमापकातील पारा ३० ते ३२ अंश से. दरम्यान झुलतो आहे तर कुलाबा येथे गेल्या आठवडय़ात दोन दिवस तापमान २९ अंश से. नोंदवले गेले होते. सकाळच्या तापमानात फारशी घट होत नसून भल्या पहाटेही तापमान २५ अंश सेल्सिअसच्या पुढेमागे रेंगाळते आहे. त्यामुळे सकाळी गारवा जाणवत नसला तरी दुपारी तापमान फारसे वाढत नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. समुद्राच्या सान्निध्याचा हा परिणाम असून सकाळी समुद्रावरून येत असलेल्या वाऱ्यांमुळे तापमान वाढत नसल्याची माहिती हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात पारा चढला
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढलेला असतानाच तापमानाचा पाराही हळूहळू चढू लागला आहे.
First published on: 14-04-2014 at 02:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature rise in state