एप्रिल महिन्यातच भीषण ऊनआगीचा सामना मुंबईकरांना सध्या करावा लागत असून, बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांत वाढती काहिली सहन करावी लागण्याची चिन्हे आहेत. अवचित पाऊस आणि समुद्राकडून बाष्प घेऊन येणारे वारे यामुळे तापमान कमी असूनही मुंबईकरांना धाप लागली आहे. ऊन, पाऊस, ढगाळ वातावरण यांचा विचित्र खेळ सध्या सुरू आहे. त्यातच दिवसातल्या कोणत्याही वेळेत घामाच्या धारांचे आक्रमण होत असल्याने मुंबईकरांच्या ‘बेचैनी निर्देशांकात’ (डिसकम्फर्ट इंडेक्स) वाढ झाली आहे. सध्याची वातावरण अस्थिरता कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत मुंबईकरांचा ऊनत्रागा वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
काहिलीकारण!
बेचैनी निर्देशांक म्हणजेच डिसकम्फर्ट इंडेक्स मोजण्याचे यंत्र नसते, मात्र बाष्प व तापमानाच्या प्रमाणावरून तो ठरवण्यात येतो. गेल्या आठवडय़ात राज्यभरात विविध ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मुंबईतही पावसाचा शिडकावा झाला. या काळात तापमान नियंत्रणात राहिले होते. मात्र पाऊस जाताच तापमापकातील पारा थोडा वर चढला. त्याला हवेतील बाष्पाचीही साथ मिळाल्याने डिसकम्फर्ट इंडेक्समध्ये वाढ झाली. तापमानातील बाष्पाच्या प्रमाणामुळे वास्तविक तापमानापेक्षा उकाडा अधिक जाणवत आहे.
तापमानस्थिती!
शनिवारी सांताक्रूझ येथे ३३.६ अंश से. तर कुलाबा येथे ३३.७ अंश कमाल तापमान नोंदवण्यात आले. या वेळी सापेक्ष आद्र्रतेचे प्रमाण अनुक्रमे ७२ टक्के व ८१ टक्के होते. त्यानुसार डिसकम्फर्ट इंडेक्सनुसार सांताक्रूझ येथे ४५ अंश से. तर कुलाबा येथे ५० अंश से. तापमानाचा उकाडा जाणवत होता. पुढील दोन दिवसांत मुंबईतील तापमान ३५ अंश से.पर्यंत जाण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. लांबलेला हिवाळा व अवकाळी पाऊस यानंतर आता कडक उन्हाळ्याची वेळ आली आहे.
निर्देशांक असा काढतात..
हवेतील बाष्प वाढले की वास्तविक तापमानापेक्षा अधिक तापमान असल्याप्रमाणे उकाडा जाणवतो. उदाहरणार्थ ३३ अंश सेल्सिअस तापमानाच्या वेळी हवेतील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण ३० ते ३५ टक्के असल्यास विशेष फरक जाणवत नाही. मात्र सापेक्ष आद्र्रता जसजशी वाढते त्याप्रमाणात उकाडाही वाढतो. ७० टक्के सापेक्ष आर्द्रतेला ४४, तर ८० टक्के सापेक्ष आद्र्रतेवेळी ४९ अंश सेल्सिअसचा उकाडा जाणवेल. तापमान आणि सापेक्ष आर्द्रता या दोन्हीवरुन हा बेचैनीचा निर्देशांक काढतात.

Story img Loader