मुंबई :  कमाल तापमान ३२ अंशापार असताना मुंबईतील किमान तापमानात मात्र सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रावर गुरुवारी किमान तापमान २० अंशाखाली नोंदले गेले. दरम्यान, तापमानाची ही स्थिती पुढील एक – दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढल्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशी विषम स्थिती अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी १९.७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १७.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेले. किमान तापमानाचा पारा जरी घसरला असला तरी दिवसभराचे तापमान मात्र चढेच असल्याने मुंबईकरांना दिवसा उकाडा आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, ही स्थिती पुढील एक दिवस अशीच राहणार आहे. त्यानंतर किमान तापमानात काही अंशांनी वाढ होईल. तसेच यानंतर पुन्हा पुढील आठवड्यात किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तरेकडील थंड वारे फक्त उत्तर व उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंत पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पहाटे किमान तापामानात घसरण होऊन मुंबईत पहाटे, तसेच रात्री किंचिंत गारवा जाणवत आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या या बदलांमुळे मुंबईकरांना थंडीसह उकाड्याचाही अनुभव घ्यावा लागणार आहे. या आठवड्यात संपूर्ण दिवसभर आकाश निरभ्र राहील, तसेच या कालावधीत कमाल तापामान ३३ ते ३५ अंशापर्यंत राहील तर, किमान तापमान १६ ते १९ अंशादरम्यान राहील.

मागील काही दिवसांत वाऱ्यांची वारंवार बदलणारी दिशा तसेच कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन राज्यावर टिकून राहिले होते. याशिवाय अधून-मधून महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांनी उत्तरेतील थंड वाऱ्यांचा अटकाव केला. परिणामी, उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचले नाहीत. त्यामुळे दिवसभर निरभ्र आकाश असूनही जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी अनुभवता आली नाही. पहाटेच्या किमान तापमानातही १ ते २ अंशानी वाढ झाली होती. यंदा जानेवारी महिन्यातच कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवता आली नाही. त्यानंतर काही दिवस किमान तापमानाच्या पाऱ्यात घट झाल्याने पहाटेचा गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला. मात्र, कमाल तापमानातील वाढ कायम असल्यामुळे दिवसभर मात्र असह्य उकाडा सहन करावा लागला. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला काही अंशी तापमानात घट झाल्यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते.