लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात किंचीत घट झाली. मात्र असे असले तरी आर्द्रतेमुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईत बुधवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असून उन्हाचा तडाखाही कमी झाला आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.

मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिकांची काहिली झाली. सध्या समुद्री वारे वेळेच्या आधी येत असल्यामुळे किनारपट्टी भागातील तापमानात घट झाली आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३३.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात किंचीत घट झाली.

मुंबईकरांना सध्या घामाच्या धारा लागत असून, अनेक ठिकाणी थंड पेयाची मागणी वाढली आहे. अशा वातावरणात पुरेशी विश्रांती आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेमुळे होणारी काहिली पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहील.

आर्द्रतेमुळे होणारे परिणाम

  • उकाडा आणि अस्वस्थता वाढते
  • उष्मागाताचा धोका
  • घामोळ्याचा त्रास

काळजी काय घ्यावी

  • पाणी भरपूर प्यावे
  • थेट उन्हात जाणे टाळावे
  • घरात हवेशीर व्यवस्था ठेवावी

पावसाला पोषक वातावरण

राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उष्णतेची लाट कायम

विदर्भात गुरुवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात गुरुवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपुरी येथे झाली. तेथे ४५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला ४५ अंश सेल्सिअस, अमरावती ४४.६ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४५.५ अंश सेल्सिअस, गोंदिया ४२.५ अंश सेल्सिअस, नागपूर ४४.४ अंश सेल्सिअस, पुणे ४१.२ अंश सेल्सिअस, लोहगाव ४३.६ अंश सेल्सिअस, जळगाव ४३ अंश सेल्सिअस, सोलापूर ४३.८ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर ४२.२ अंश सेल्सिअस आणि परभणी येथे ४४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.