मुबंई : मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागला असून एका दिवसात तापमानात चार अंशानी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारीही वातावरणातील ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
एप्रिलच्या सुरुवातीलाच मुंबईच्या तापमानात वाढ झाली असून मुंबई आणि परिसरात सध्या ढगाळ वातावरणामुळे दुपारी उन्हाचे चटके आणि असह्य उकाड्याची जाणीव सहन करावी लागत आहे. वातावरणातील दाहकता वाढल्याने डोक्यावर टोपी किंवा रुमाल घेऊन मुंबईकर बाहेर पडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील कमाल तापमान साधारण ३१ ते ३३ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. मात्र, त्याच वेळी पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३३.५अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद३ात ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कुलाबा केंद्रात कमाल तापमान ०.८ अंश सेल्सिअसने, तर सांताक्रूझ केंद्रात ४.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली. बुधवारीही ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यापूर्वी २१ एप्रिल २०२० मध्ये ३७.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. २२ एप्रिल २०१४ ३९ अंश सेल्सिअस, २८ एप्रिल २०१३ मध्ये ३७.३ अंश सेल्सिअस तर , १६ एप्रिल २०१२ मध्ये ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.
मध्य महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच पूर्वेकडून येणारे जोरदार वारे यामुळे मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे. ही तापमानवाढ बुधवारीही काय राहणार आहे. या कालावधीत तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघर भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी काही भगाात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
राज्यात उकाडा, ऊन आणि पाऊस अशी स्थिती
राज्यात उकाडा, ऊन आणि पाऊस अशी परिस्थिती दिसून येत आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागामध्ये पावसाटी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणामुळे उकाडा सहन करावा लागत आहे.
यंदाच्या उन्हाळा हंगामात सरासरीपेक्षा अधिक तापमान
यंदाच्या उन्हाळा हंगामात म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार आहे. हे तीन महिने राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. तसेच राज्यात तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. तसेच एप्रिल महिन्यात राज्यातील उष्णता अधिक वाढण्याची शक्यता असून पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
देशात सरासरी ८८ ते ११२ टक्के पावसाची शक्यता
देशात सरासरी ८८ ते ११२ टक्के पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अदिक पावसाची तर विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.