मुंबई : मुंबई आणि परिसरात उकाड्याची धग कायम असून मंगळवारी एका दिवसात तापमानात साडेचार अंशांनी वाढ झाली. त्यातच मुंबईचा काही भाग आणि नवी मुंबईत मंगळवारी पहाटे तर परळ, वांद्रे, विलेपार्ले येथे रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.एप्रिलच्या सुरुवातीलाच मुंबईच्या तापमानात वाढ झाली असून मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडा जाणवू लागला आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक असून हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३३.५ अंश, तर सांताक्रूझ केंद्रात ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सांताक्रूझ केंद्रात तब्बल ४.५ अंशांची वाढ नोंदविली गेली. बुधवारीही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान राहील तसेच मुंबईसह ठाणे, पालघर भागात विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी काही भगांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील.