लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : आठवडाभर रात्री आणि पहाटे गारवा अनुभवल्यानंतर मुंबईकरांना वाढलेल्या तापमानामुळे दुपारी घाम फुटू लागला आहे. दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाल्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शुक्रवारी ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, तापमानावाढीचे हे सत्र पुढील दोन – तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत आठवडाभर किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारवा निर्माण होऊन काहिसा दिलासा मिळाला होता. कमाल तापमानात वाढ झाली असली तरी गुरुवारपासून किमान तापमानातही वाढ झाली आहे. यामुळे दिवसभर असह्य उकाडा सहन करावा लागत असून दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३४.३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कुलाबा येथे तापमान दोन अंशानी अधिक होते. तर सांताक्रूझ येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशाने अधिक नोंदले गेले. याआधी २०१८ मध्ये सांताक्रूझ येथे ३७.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.
दिवसभर उकाडा आणि दुपारी उन्हाचा तडाखा यामुळे शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना अधिक त्रास सहन करावा लागला. हिवाळ्याचा हंगामही संपुष्टात येण्याच्या बेतात आहे. दरम्यान, सध्या दुपारी पूर्वेकडून वारे वाहत आहेत, तर सायंकाळी उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे दुपारी उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईबरोबरच राज्यातही पहाटेचा गारवा कमी झाला आहे. अनेक भागात किमान तापमानातही वाढ झाली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. कमाल आणि किमान तापमानातील ही वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी येथे शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तेथील तापमान ३८.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ६.६ अंशानी अधिक होते.