गेल्या आठवडय़ात ऐन फाल्गुनात झालेल्या ‘वर्षां’वामुळे पारा खाली घसरला आणि उन्हाळा सुसह्य झाला होता. या अचानक झालेल्या पावसामुळे दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली होती. मात्र मंगळवारपासून मुंबईचा ‘पारा’ चांगलाच चढला. मंगळवारी दिवसभरात कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी वाढल्याने अंगाची काहिली सुरू झाली.
गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे दिवसभरातील कमाल तापमानातही काही प्रमाणात घट झाली होती. कमाल तापमान २६ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावले होते. रात्रीचे किमान तापमानही १६ ते २० अंश सेल्सिअस इतके नोंदले जात होते. मंगळवारचा दिवस मात्र मुंबईकरांसाठी उकाडय़ाचा ठरला. मुंबईकरांना उन्हाचा दाह जाणवू लागला. ‘आजचा दिवस वेगळा’असल्याचा अनुभव मुंबईकरांना आला. कुलाबा वेधशाळेत ३२ अंश तर सांताक्रूझला ३५ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले.
उन्हाळ्यास सुरुवात झाली असून त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्यात तापमानात वाढ होणे साहजिक आहे. मंगळवारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसने जास्त होते, असे वेधशाळेचे संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले.