मुंबई : यंदाचा उन्हाळा तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. एप्रिल, मे आणि जून, या तीन महिन्यांत देशभरात किमान, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या झळांच्या तीव्रतेत आणि दिवसांत वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात सरासरी इतक्या उन्हाळी पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी एप्रिल, मे आणि जून, या तीन महिन्यांचा हवामान विषयक अंदाज जाहीर केला. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत कोकणपासून खालील पश्चिम किनारपट्टीचा भाग वगळता उर्वरीत देशात किमान, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या झळांची तीव्रता आणि उष्णतेच्या झळांच्या दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून, या तीन महिन्यांत मध्य भारतात सरासरी चार ते सात दिवस उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागतो. यंदा काही भागात दहा ते अकरा दिवस उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. झारखंड, ओदिशामध्ये उन्हाच्या झळांचे दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य ?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

प्रशांत महासागरातील कमजोर अवस्थेत असलेली ला निना स्थिती आणखी कमजोर झाली आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत प्रशांत महासागरात निष्क्रीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. जूननंतर एल निनो स्थिती हळूहळू निर्माण होण्याचा अंदाज आहे. ला निना स्थिती मोसमी पावसासाठी अनुकूल आणि एल निना स्थिती प्रतिकूल असते. पण, मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरात निष्क्रीय स्थिती असल्यामुळे आणि हिंदी महासागरातील द्विध्रुविता (आयओडी) ही निष्क्रीय राहण्याचा अंदाज. या दोन्ही निष्क्रीय स्थितीमुळे यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज आहे. त्या बाबत हवामान विभागाकडून मे महिन्यांत अधिकृत घोषणा होईल.

मार्च महिना सरासरीपेक्षा उष्ण

जानेवारी, फेब्रुवारी या यंदाच्या पहिल्या दोन महिन्यांप्रमाणेच मार्च महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. मार्चमध्ये किमान तापमान सरासरी १७.७१ अंश सेल्सिअस असते, ते यंदा १८.३२ अंश सेल्सिअस होते. तर कमाल तापमान सरासरी ३१.७० अंश सेल्सिअस असते, ते यंदा ३२.६५ अंश सेल्सिअस होते. मार्चमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. तरीही अतिवृष्टीच्या ६० घटनांची नोंद झाली आहे.

दक्षिण महाराष्ट्र, कोकणात उन्हाळी पाऊस

राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात उन्हाळी पावसाची शक्यता आहे. त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळी पावसाची शक्यता कमी आहे. किनारपट्टीवरील एप्रिलमधील संभाव्य उन्हाळी पावसामुळे आंबा पिकाच्या मोठ्या नुकसानीची भीती आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperatures were above average in the three months of april may and june mumbai news amy