म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून १ मार्च २०२० रोजी काढण्यात आलेल्या गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या सोडतीतील विजेत्यांची घराची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येणार आहे. अखेर मुंबई मंडळाने ३८९४ पैकी १३६९ पात्र गिरणी कामगार, वारसांना तात्पुरते देकार पत्र देण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन पदधतीने ही पत्रे वितरीत करण्यात येत असून ते मिळालेले पात्र कामगार आणि वारसाकडून आता घराची रक्कम भरून घेण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>Video: स्वत: रिया चक्रवर्तीनं सांगितलं होतं कोण आहे ‘AU’! ‘त्या’ मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल!
बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर बांधण्यात आलेल्या ३ हजार ८९४ घरांसाठी मार्च २०२० मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र सोडतीनंतर काही दिवसांतच एका गिरणी कामगार संघटनेने या सोडतीवर आक्षेप घेतल्याने उच्च न्यायालयाच्या सनियंत्रक समितीने सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया रखडली. मागील वर्षी मात्र म्हाडाच्या मुंबई मंडळाने संनियंत्रक समितीकडे विनंती अर्ज करून पात्रता निश्चिती सुरू करण्याची परवानगी मागितली. पात्रता निश्चिती पूर्ण केली तरी सोडतीला देण्यात आलेली स्थगिती उठवल्यानंतरच घराचा ताबा देऊ असे आश्वासन दिले. त्यानुसार आता घराची रक्कम भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १३६९ पात्र गिरणी कामगार, वारसांना तात्पुरते देकार पत्र ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने देकार पत्र देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेतील मुख्य बदलानुसार आता सोडतीनंतरचीही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>कुपोषणाची समस्या :आदिवासी भागांत जाण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
पात्र गिरणी कामगार, वारस यांनी मंडळाकडे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर मंडळातर्फे लिखित संदेश पाठविण्यात आला आहे. या संदेशात तात्पुरत्या देकार पत्राची प्रत डाउनलोड करावयाची लिंक पाठविण्यात आली आहे. या लिंक वरून पात्र गिरणी कामगार, वारस यांनी आपल्या स्मार्ट फोनवरून देकार पत्राची प्रत डाउनलोड करून घ्यायची आहे. प्रत्येक गिरणी कामगारांचे तात्पुरते देकार पत्र सिस्टिम जनरेटेड असून लाभधारकास मिळणाऱ्या तात्पुरत्या देकार पत्रावर त्यांचा स्वतंत्र बँक खाते क्रमांक दिला गेला आहे. नमूद बँक खात्यावर त्यांनी आपल्या गाळ्याच्या विक्री किंमतीचा भरणा एनईएफट, आरटीजीएसद्वारे करावयाचा आहे. लाभधारक पात्र गिरणी कामगार, वारस या तात्पुरत्या देकार पत्राच्या प्रतीच्या साहाय्याने सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करू शकतात. मात्र, सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी लाभधारक गिरणी कामगार, वारसांना मुंबई बँकेच्या शाखेतू टोकन देऊन मूळ तात्पुरते देकार पत्र प्राप्त करून घेणे बंधनकारक असणार आहे.
तात्पुरत्या देकार पत्राची प्रत ऑनलाईन मिळाल्याच्या तारखेपासून १०५ दिवसांत पात्र गिरणी कामगार, वारस यांना सदनिकेच्या विक्री किंमत भरावी लागणार आहे. यामधील १० टक्के रक्कम पत्र मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत आणि उर्वरित ९० टक्के रक्कम ६० दिवसात भरायची आहे. ही रक्कम भरल्यानंतर सदनिकेचा ताबा देण्यात येतो. त्यानुसार पुढे ताबा देण्याची प्रक्रिया राबिण्यात येण्याची शक्यता आहे.