मुंबई : देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासोबतच शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टने संकल्प सोडला असून आजमितीला महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील चार हजार गावांमधील २२ हजार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यात संस्थेला यश आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दहा पटीने वाढ झाली आहे. तसेच, चार कोटींहून अधिक फळझाडे लावल्याचे टाटा सामाजिक संस्थेने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
भारतातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टने ग्रामीण भागात २०१५ पासून विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना सक्षम करणे, त्यांची आर्थिक बाजू सबळ करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे. संस्थेने महाराष्ट्रातील पालघर, नांदेड, बीड, सोलापूर, धाराशिव, जळगाव, तसेच मध्य प्रदेशातील बुरहानपूर, धार/ बरवणी आदी विविध जिल्ह्यांमध्ये कृषी विकास उपक्रम राबविले आहेत. संस्थेने परळीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पाणीटंचाईची समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या व शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित भागात २२२ कोटी लिटर पाण्याचा साठा, तसेच १६४ शेततळी, ६२ धरणे व ५ बंधारे बांधण्यात आली. त्यानंतर, ग्लोबल विकास ट्रस्टने भात, मका, सोयाबीन, कापूस आदी विविध पारंपरिक पिकांऐवजी पपई, केळी, मलबेरी, आंबा, लिंबू, पेरू, रेशीम, डाळिंब आदी विविध आधुनिक तसेच अधिक उत्पन्न मिळवून देणारे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले. शेतीसाठी त्यांना उत्कृष्ठ दर्जाच्या जवळपास ३२३३ रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच, मातीचा पोत सुधारण्यासाठी सात्विक पद्धतीने म्हणजेच गाय आधारित शेतीवर भर देण्यात आला. संस्थेकडून अनेकदा शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करून शेतकऱ्यांमध्ये परिसंवादही घडवून आणण्यात येतो. गेल्या आठ वर्षांमध्ये परळीमधील हरित क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारली असून पावसाच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. ग्लोबल विकास ट्रस्टने येत्या पाच वर्षात ९९ हजार ४५१ शेतकऱ्यांच्या मदतीने २ लाख १८ हजार ४६ एकर जमिनीवर २७ कोटी ४४ लाख ४८ हजार ८८ इतकी झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे.
हेही वाचा – एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार
देशामध्ये शिक्षण व आरोग्य क्षेत्रात चांगल्या सुधारणा होत आहेत. मात्र, देशातील ६५ टक्के शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती बदलू शकलो नाही, तर देशाची प्रगती होऊच शकत नाही. तसेच, देश अभियान किंवा उपक्रम राबवून बदलणार नाही. त्यासाठी आंदोलनच प्रभावी हत्यार असून त्याची अमलबजावणी कृषी विकासामध्ये करत आहोत. शेतकऱ्यांची प्रगती झाल्यास देश पुन्हा सोने की चिडिया बनू शकतो, असा विश्वास ग्लोबल विकास ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त मयंक गांधी यांनी व्यक्त केला.
शेतीविषयक प्रशिक्षणासाठी कृषीकुलची उभारणी
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी परळी येथे कृषीकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. सुमारे २५ एकर जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या या केंद्रात शेतकऱ्यांना शेतीविषयक धडे देण्यात येतील. जेणेकरून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. या प्रशिक्षण केंद्रासाठी मोतीलाल ओसवाल या संस्थेची मदत घेण्यात येत असून येत्या एप्रिलमध्ये केंद्राचे उद्घाटन होणार आहे. पुढील काळात देशाच्या इतर भागांमध्ये कृषीकुल उभारण्यासाठी शासन मदतीची आवश्यकता असल्याचे मयंक गांधी यांनी सांगितले.