आपण जिथे रहातो, लहानाचे मोठे होतो त्या वास्तूबरोबर, तिथल्या माणसांबरोबर आपले एक आत्मीयतेचे नाते तयार होते. ती वास्तू आपल्या आयुष्यातील अनेक सुख-दु:खाची साक्षीदार असते. जेव्हा अचानक एकदिवस त्या वास्तूमधुन बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा मनाची प्रचंड घालमेल होते, मन तुटते पण काळाबरोबर चालायचे असल्याने ते दु:ख पचवून पुढे जावे लागते.
गिरगावमधील १२५ वर्ष जुन्या क्रांतीनगर चाळ क्रमांक २६० मधील रहिवाशांना सुद्धा सध्या अशाच परिस्थितीतून जावे लागत आहे. ए,बी आणि सी अशा तीन भागांमध्ये विभागलेली ही क्रांतीनगर चाळ मेट्रो प्रकल्पासाठी जमीनदोस्त केली जाणार आहे. ज्या चाळीमध्ये आमच्या चार पिढया घडल्या ती वास्तू आता रहाणार नाही याचे दु:ख या चाळीमधल्या रहिवाशांना आहे. टाइम्स ऑफ इंडियाचे हे वृत्त दिले आहे.
८५ वर्षाच्या श्रीहरी म्हात्रे यांनी रविवारी अखेरचे या चाळीला आपल्या डोळयात साठवून घेतले. त्यावेळी ते प्रचंड भावूक झाले होते. म्हात्रे आता अंधेरीला आपल्या मुलाकडे रहातात. रविवारी या चाळीतील रहिवाशांचे शेवटचे स्नेहमिलन पार पडले. म्हात्रे अखेरचे या चाळीला पाहण्यासाठी क्रांतीनगरमध्ये आले होते. इथे माझा जन्म झाला याच ठिकाणी माझा शेवट व्हावा असे वाटत होते पण आता हे घडणार नाही असे श्रीहरी म्हात्रे म्हणाले.
ही चाळ म्हणजे आमचे एक मोठे कुटुंब होते. जर मला माझ्या आईने बनवलेले जेवणे आवडले नाही तर मी शेजाऱ्याच्या घरात जाऊन हक्काने जेवायचो. मध्यमवर्गीय कुटुंब या चाळीत रहायची. त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत होते. पण सर्वांचे मन मोठे होते अशी आठवण म्हात्रे यांनी सांगितली. विकासाची किंमत या चाळीतील ११८ कुटुंबाना चुकवावी लागणार आहे. सरकारने या चाळीतील रहिवाशांना याच भागात मोठी आणि आधुनिक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले आहे. आयुष्यभर आम्ही या चाळीत एकत्र राहिलो पण आता वर्षानुवर्षाचा शेजार तुटणार याचे दु:ख या रहिवाशांना आहे.