अदाणी उद्योग समुहाकडून होत असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी अदाणी समूहासह शिंदे सरकारवर हल्लाबोल केला होता. यानंतर अदाणी समूहाकडून खुलासा करण्यात आला आहे. धारावी प्रकल्पाच्या अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत, असं अदाणी समूहाने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर अदाणी समूहाने पत्रक काढलं आहे. त्यात अदाणी समूहाने म्हटलं, “धारावी प्रकल्प निष्पक्ष, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय बोलीद्वारे अदाणी समूहाला मिळाला आहे. धारावी प्रकल्पाच्या अटी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील आहेत. निविदा प्रक्रियेनंतर अटींमध्ये समूहाने कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे समूहाला कुठलाही लाभ झाल्याचा दावा करणं चुकीचं आहे.”

हेही वाचा : “सरकार येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका”, धारावी मुद्द्यावरून ठाकरेंचं पोलिसांना आवाहन; म्हणाले, “गुंडागर्दी झाली तर…”

“धारावी प्रकल्पाबाबत चुकीची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला जातोय. सर्व सदनिकाधारकांना धारावीत घरे देण्यात येतील. तसेच, पात्र सदनिकाधारांना मुंबईतील ‘एसआरए’पेक्षा १७ टक्के अधिक क्षेत्रफळ मिळेल,” असं अदाणी समूहाने सांगितलं.

हेही वाचा : ‘अदाणींनी मुंबईसाठी काय केले? ‘मोदाणी’ला धारावीचे लचके तोडू देणार नाही’, वर्षा गायकवाड यांची टीका

“निविदेतील अटी आणि कायद्यानुसारच ‘टीडीआर’चं पालन केलेले आहे. धारावीकरांच्या पुनर्वसनावर ‘टीडीआर’चा कुठलाही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिका आणि सरकारने तयार केलेल्या संकेतस्थळाद्वारे ‘टीडीआर’चे व्यवस्थापन करून त्याचे परीक्षण केले जाईल,” असंही अदाणी समूहाने म्हटलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“करोनाच्या काळात धारावीतील लोकांना पात्र-अपात्र ठरवलं नाही. मग, विकास करताना पात्र अपात्र ठरवणारे तुम्ही कोण? धारावीतील अपात्र नागरिकांना मिठागरात पाठवणार आहेत. अद्यापही मिठागराचा निर्णय झाला नाही. म्हणजे मिठागराची जागा सुद्धा ९९ वर्षांच्या करारावर अदाणींना देणार आहेत. आता ५० ते ५५ हजार लोक पात्र आहेत. तर, लाखांच्यावरती लोक अपात्र आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“आमचा विकासाला विरोध नाही”

“धारावीतील नागरिकांना मिठागरात पाठवून त्याचंही पुर्नविकास करण्याचासाठी अडाणींना देण्यात येईल. विकासाच्या नावाखाली सगळंच अदाणींच्या घशात घालण्याचं काम चालू आहे. धारावीकरांना ५०० फूटांचं घर मिळालं पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही. धारावीकरांना जिथल्या-तिथे घर मिळाले पाहिजेत. तसेच, रेल्वेलाईनमध्ये अदाणींनी त्याचं घर बांधावे. धारावीकरांचा घर बांधू नये,” असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं आहे.

“फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा ‘टीडीआर’ देण्यात आला नाही”

“धारावीतील संडास, बाथरूम सगळ्यांचा ‘टीडीआर’ अदाणींना देऊन टाकला आहे. फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा ‘टीडीआर’ देण्यात आला नाही. कारण, बिनसवलतीच्या ढगांचा पाऊस एवढा पाडला आहे की, आणखी ढगांची गरज नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tender conditions finalised maha vikas aghadi adani group uddhav thackeray march dharavi redevelopment project ssa