मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून गती दिली जात आहे. वांद्रे कुर्ला संकुल-शिळफाटा या २१ किलोमीटर भुयारी मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असताना आता शिळफाटा ते झारोळी (महाराष्ट्र-गुजरात सीमा) या ऊर्वरित १३५ किलोमीटरच्या मार्गासाठीही मंगळवारी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन स्थानकांचीही कामे होणार आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १४ मार्च २०२३ असून १५ मार्च २०२३ ला निविदा खुली होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 राज्यातून बुलेट ट्रेनचा मार्ग हा १५६ किलोमीटर एवढा आहे. यापैकी ठाणे शिळफाटा ते झारोळी या ऊर्वरित १३५ किलोमीटर मार्गाच्या कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये ठाणे, विरार, बोईसर या तीन स्थानकांचाही समावेश आहे. या मार्गावर काही पट्टय़ात होणारे बोगदे, दुहेरी मार्गिका, अन्य तांत्रिक कामे, स्थानक इमारती, बुलेट गाडय़ांसाठी आगार यासह अन्य कामे मोठय़ा प्रमाणात केली जाणार आहेत. १३५ किलोमीटरच्या मार्गात ११ नद्यांवरील पूल आहेत तर सहा बोगदे आहेत.

निविदांना प्रतिसाद

आता राज्यातील संपूर्ण १५६ मार्गाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचाही समावेश आहे. भुयारी मार्गासाठीची निविदा २० जानेवारी २०२३ ला खुली केली जाणार आहे. याशिवाय अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकामासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला असून लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड, अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि एमईआयएल-एचसीसी (संयुक्त) या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tender for works 135 km bullet train speeding up work shilphata jharoli route ysh