मुंबई : ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि ठाण्यावरून थेट नवी मुंबईत जाणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आणखी एक उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरी ते पाटणी असा हा पूल आहे. या पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून अहवालाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महिन्यात यासंबंधीचा अहवाल येणे सादर होणे अपेक्षित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातून नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणेकरांना मोठी कसरत करावी लागते. कळवा नाक्यावरून पूल ओलांडून नवी मुंबईत जावे लागते. त्यामुळे विटावा-कोपरीदरम्यान पूल बांधण्याची मागणी मागील कित्येक दिवासांपासून स्थानिकांकडून केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने एमएमआरडीएवर या पुलाची जबाबदारी टाकली आहे. त्यानंतर एमएमआरडीएने कोपरी ते पटणीदरम्यान पूल बांधण्याचा निर्णय घेत त्यादृष्टीने तयारी सुरू केली आणि आता यादृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे. या पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नुकत्याच एमएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.

या निविदेनुसार हा पूल साधारणपणे ६०० मीटर लांबीचा असेल. तर पुलाला जोडणारा रस्ता साधारणपणे ४०० मीटर लांबीचा असेल. कोपरीच्या विसर्जन घाटापासून या पुलाची सुरुवात होणार आहे. या कामासाठी २३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आता सविस्तर प्रकल्प अहवालाची निविदा पुढील काही दिवसांत अंतिम करून अहवालाच्या कामास सुरवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महिन्यात अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. अहवाल सादर झाल्यानंतर पुढे प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल आणि त्यानंतर कामाला सुरुवात होईल. म्हणजेच पुलाच्या कामास सुरुवात होण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे. पण हा पूल तयार झाल्यास ठाणे ते नवी मुंबई प्रवास जलद आणि सुकर होणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून या पुलाच्या निर्मितीच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे पाऊल ठाणेकर आणि नवी मुंबईकरांना दिलासा देणारे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tender issued by mmrda for preparation of detailed project report of kopri to patni bridge mumbai print news amy