मुंबई : कोन, पनवेल येथील गिरणी कामगारांसाठीच्या दोन हजार ४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा जारी केली आहे. त्यामुळे आता लवकरच या घरांची दुरुस्ती होणार असून, विजेत्या कामगारांना घरांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील कोन, पनवेलमधील दोन हजार ४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली होती. मात्र अजूनही विजेत्या कामगारांना घरांचा ताबा मिळालेला नाही. विविध कारणांमुळे घरांचा ताबा रखडला असून अनेक कामगार गृहकर्जाचा समान मासिक हप्ता भरत आहेत. एकूणच ताबा रखडला असताना म्हाडा आणि एमएमआरडीएमध्ये गेले वर्षभर घरांच्या दुरुस्तीच्या खर्चावरून वाद सुरू आहे. या वादामुळे ताबा प्रक्रिया आणखी लांबली आहे. मुंबई मंडळाने कामगारांना घरांचा ताबा लवकरात लवकर देता यावा यासाठी घरांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – निवृत्तिवेतन योजनांच्या अभ्यासासाठी समिती, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; तीन महिन्यांत अहवाल

हेही वाचा – “ज्या ‘महाशक्ती’चं नाव तुम्ही उठताबसता घेता, ती…”; जुन्या पेन्शन योजनेवरून ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्लाबोल!

आता मंडळ स्वतः घरांच्या दुरुस्तीचा खर्च उचलणार आहे. मात्र हा खर्च घरांच्या वितरणातून एमएमआरडीएला मिळणाऱ्या रक्कमेतून वसूल केला जाणार आहे. या निर्णयानुसार मंडळाने नुकतीच दुरुस्तीसाठी निविदा जारी केली असून बुधवारपासून (१६ मार्च) निविदा सादर करण्यास सुरुवात होत आहे. ३१ मार्चपर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असून ३ एप्रिलला तांत्रिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर निविदेची पुढील प्रकिया पूर्ण करून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.