लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास पालिका प्रशासनाने नकार दिल्यामुळे त्या मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे याबाबतचा तिढा सुटलेला नाही. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम तलावातच विसर्जन करावे अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र १४ ते १५ फुटाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात होऊ शकत नाही, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोमवारी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाबाबतचा तिढा कायम होता. मंगळवारी अकराव्या दिवशी सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून हा पेच कसा सोडवायचा याबाबत उशीरापर्यंत खलबते सुरू होती.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती तयार करणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक तत्वे योग्य ठरवली आहेत. त्यामुळे, माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. मात्र तरीही दीड दिवसांच्या व पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मुंबईत विविध ठिकाणी विशेषतः पश्चिम उपनगरात झाले. त्यामुळे शाडूची माती तयार करणाऱ्या मूर्तीकारांनी पालिकेकडे व पोलिसांकडे आक्षेप घेतले होते.
त्यानंतर सातव्या दिवशीच्या विसर्जनाला ७ फेब्रुवारी रोजी समुद्र किनाऱ्यांवर मूर्ती विसर्जन करण्यास पालिका प्रशासनाने मंडळांना परवानगी दिली नाही. त्यामुळे बहुतांशी मंडळांच्या गणेशमूर्ती मंडळात परत पाठवाव्या लागल्या. मंडपांमध्ये या मूर्ती झाकून ठेवण्यात आल्या आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद पीओपीच्या मूर्तीकारांमध्ये व गणेशोत्सव मंडळांमध्ये उमटले आहेत. रविवारी सकाळी राज्यभरातील पीओपी मूर्तीकारांच्या संघटनांची व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक लालबाग येथे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्य सरकारला या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी २४ तासांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी मंडळांचे प्रतिनिधी व पीओपी मूर्तीकारांचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र ती बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे या विषयावर तोडगा निघू शकला नाही.
पालिका प्रशासनाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कृत्रिम तलाव बांधून दिला असून त्यात विसर्जन करावे असे निर्देश पालिका प्रशासनाने मंडळांना दिले आहेत. मात्र हा कृत्रिम तलाव लहान असून १४ ते १५ फूटाच्या किमान पंधरा मूर्ती आहेत. त्यांचे विसर्जन या कृत्रिम तलावात होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया मंडळाच्या प्रतिनिधींनी दिली. कांदिवली परिसरातच सार्वजनिक गणेशमूर्ती मोठ्या संख्येने असून डहाणूकर वाडी येथील तलावात विसर्जन करण्याची परवानगी मंडळांनी मागितली होती. मात्र ती देखील पालिका व पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे गणेशमंडळांसमोर पेच निर्माण झाला आहे.
११ फेब्रुवारीला जनआंदोलन उभे करून कांदिवलीतून मोठ्या प्रमाणावर मिरवणूका काढण्याचा इशारा पीओपी मूर्तीकारांनी व मंडळांनी दिला होता. मात्र सोमवारी रात्री उशीरापर्यंत याबाबत निर्णय झाला नव्हता. पीओपी मूर्तीकारांच्या संघटनेने गणेशोत्सव मंडळांना सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.