त्वचा उजळ करण्याचा दावा करणा-या लॉरिएल या कंपनीच्या उत्पादनांमध्ये पारा आढळला आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लॉरिएलच्या पाच उत्पादनांची तपासणी केल्यावर ही माहिती समोर आली आहे. त्वचेवर लावल्या जाणा-या क्रीममध्ये पारा असल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा आणि त्वचेसंबंधी आजार होण्याची शक्यता असते असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉरिएल कंपनी अडचणीत सापडली आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लॉरिएल कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पातून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नमुने घेतले होते. यातील पाच नमुन्यांमध्ये पा-याचे प्रमाण ०.६ पार्टस् पर मिलीयन (पीपीएम). १.०२ पीपीएम, १.६९ पीपीएम, १.८७ पीपीएम, २.३८ पीपीएम ऐवढे असल्याचे निष्पन्न झाले. लॉरिएलच्या गार्नियर मेन पॉवर लाइट इंटेन्सिव्ह फेअरनेस फेसवॉश, गार्नियर मेन पॉवर लाइट स्वेट प्लस ऑइल कंट्रोल फेअरनेस मॉइश्चराइजर, लॉरिएल पर्ल परफेक्ट फेअरनेस क्रिम (नाईट), लॉरिएल परफेक्ट फेअरनेस प्लस मॉइश्चराइजिंग क्रिम (डे) आणि लॉरिएल पर्ल परफेक्ट रि लायटनिंग व्हाईटिंग फोम या पाच उत्पादनांमध्ये पारा आढळला आहे. एप्रिलसमध्ये या क्रीमचे उत्पादन झाले होते. भारतातील औषध आणि सौंदर्य उत्पादन नियमावली १९४५ नुसार पारा असलेल्या सौंदर्य उत्पादन तयार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील एफडीएच्या तपासणीत पा-याचे प्रमाण जास्त आढळले असले तरी फ्रान्समध्ये लॉरिएलच्या उत्पादनात पा-याचे प्रमाण हे नोंदही घेता येत नव्हती इतके आढळले आहे. महाराष्ट्र एफडीएचा एप्रिल २०१६ मधील अहवाल हा फ्रान्स, जर्मनी, जपान आणि सिंगापूर या देशांमधील तपासणी अहवालापेक्षा वेगळा आहे. या सर्व देशांमध्ये आमच्या उत्पादनांमध्ये पा-याचे प्रमाण नोंद घेण्याइतपतही नव्हते असे समोर आले होते असा दावा कंपनीच्या प्रवक्त्यांनी केला आहे. एक जबाबदार कंपनी म्हणून आम्ही भारत किंवा जगभरातील कोणत्याही देशातील उत्पादनांमध्ये पारा वापरत नाही. आम्ही महाराष्ट्र एफडीएच्या अहवालाला कोलकाता येथील केंद्रीय तपासणी केंद्रात आव्हान दिले आहे असेही प्रवक्त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार त्वचेचा रंग उजळण्यासाठी लावण्या जाणा-या क्रिममध्ये पारा वापरल्यास त्यामुळे प्रामुख्याने मूत्रपिंडासंबंधीचे आजार बळावतात. त्याशिवाय त्वचेचा रंग जाणे, त्वचेवर चट्टे येणे यासारखे त्वचासंबंधीच्या समस्याही निर्माण होतात. तसेच पारा हा विष असल्याने त्याचा परिणाम शरीराच्या मज्जासंस्थेवरदेखील होतो.
लॉरिएल अडचणीत, एफडीएच्या तपासणीत फेअरनेस क्रीममध्ये आढळला पारा
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लॉरिएलच्या पाच उत्पादनांची तपासणी केल्यावर ही माहिती समोर आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-09-2016 at 08:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tests show mercury in loreal products maharashtra fda