मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व दहा जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. छात्र भारती विद्यार्थी संघटनेने दहापैकी पाच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात महत्वाची मानली जाणारी यंदाची अधिसभा निवडणूक ही ठाकरे गटाची युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांच्यात रंगणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ५२ जणांनी अर्ज भरले असल्याचे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान काही महिन्यांपूर्वी मतदार नोंदणीवरून हिरीरीने भांडणारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि युवासेनेच्या शिंदे गटाकडून एकाही जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचे समजते आहे.

बहुप्रतिक्षित अशी मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक गणेशोत्सवानंतर होत आहे. मागील पंचवार्षिक अधिसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेने दहा पैकी दहा जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदाही ठाकरे गटाच्या युवा सेनेने सर्व दहा जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचही सर्व दहा जागा लढवत ठाकरे गटाच्या युवा सेनेला आव्हान देण्यास सज्ज झाला आहे. ठाकरे गटाची युवा सेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे. छात्र भारती विद्यार्थी संघटना दहा पैकी पाच जागांवर उमेदवार उभे करीत अधिसभेच्या आखाड्यात उतरली आहे. ‘मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत दहापैकी दहा जागा लढवणार आहोत. शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा घवघवीत यश संपादन करू’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. तर ‘विद्यापीठातील राजकीय हस्तक्षेप बंद करून विद्यापीठात विद्यार्थी हिताचे कार्य करण्यासाठी विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार कटिबद्ध राहतील’, असे मत अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक हर्षद भिडे यांनी व्यक्त केले. तसेच छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले म्हणाले की, ‘मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवणार आहोत. आम्ही पाच जागा लढवत आहोत. विद्यापीठाच्या उज्वल भविष्यासाठी जे सोबत येतील, त्यांना सोबत घेऊ. विद्यापीठाचे हित पाहणाऱ्या ज्या व्यक्तींनी वैयक्तिकरित्या उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्याशी चर्चा करून निवडणुकीसाठी एक पॅनल तयार करू’.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
oath ceremony of Mahavikas Aghadi MLAs in the assembly session print politics news
महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधी
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

हेही वाचा – अल्पसंख्याक आयोगाला नोकरी संदर्भातील आदेश देण्याचा अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याची तयारी केली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणापलीकडे मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत ठाकरे बंधू समोरासमोर उभे ठाकणार होते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अधिकृतपणे एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. शिंदे गटाच्या युवा सेनेनेही अधिसभा निवडणुकीच्या मैदानात एकाही उमेदवाराला उतरवलेले नाही. तर त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि शिंदे गटाची युवा सेना कोणत्या संघटनेला पाठिंबा देते? याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या राज्य सचिवांकडून अर्ज दाखल

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून एकाही जागेसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव व माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी वैयक्तिकरित्या अर्ज दाखल केलेला आहे. ‘मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सचिव आहे आणि पक्षाचा एक पदाधिकारी व कार्यकर्ता म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे’, असे सुधाकर तांबोळी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन गणवेशाविना?

२२ सप्टेंबरला निवडणूक, २५ सप्टेंबरला निकाल

मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही एकूण १० जागांसाठी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. तर २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५२ जणांनी अर्ज भरले असल्याचे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. आता १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील फिरोजशाह मेहता सभागृहात (व्यवस्थापन परिषदेचे दालन) होणार आहे.

बहुजन विकास आघाडीतर्फे चार उमेदवार रिंगणात

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीच्या रिंगणात बहुजन विकास आघाडीने (वसई) एकूण चार उमेदवार उतरवले आहेत. बहुजन विकास आघाडीने खुल्या प्रवर्गातून १, इतर मागासवर्ग प्रवर्ग १, अनुसूचित जमाती प्रवर्गातून १, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून १ असे ४ उमेदवार बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवणार आहेत.

Story img Loader