कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी दगडफेक करत पोलिसांशी धक्काबुक्की केल्यानंतर पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला. या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये धार्मिक तणावाचं वातावरण तयार झालं आहे. राज्यातील धार्मिक तणावाच्या वाढत्या घटनांवरून विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या दगडफेकीमागील सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे. ते बुधवारी (७ जून) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनिल परब म्हणाले, “कोल्हापूरमधील दगडफेकीमागील सूत्रधार कोण आहेत? ते शोधले पाहिजे. जाणूनबुजून असं केलं जातंय का ते शोधलं पाहिजे. जाणूनबुजून केलं जात असेल तर त्याची कारणं काय ती शोधली पाहिजे. याला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का हे शोधलं पाहिजे. मला वाटतं पोलिसांनी आपलं काम चोख केलं पाहिजे. कोणत्याही दबावाखाली याची चौकशी होता कामा नये.”
“कुठला गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करेल”
“जर महाराष्ट्रात अशांतता असेल तर कुठला गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार होईल. आमच्याकडे पोलिसांकडून अपेक्षा करणं हाच एक मार्ग आहे. कारण योग्यप्रकारे तपास करणं ही पोलिसांचीच जबाबदारी आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी अनिल परब यांनी केली.
“समाजातील खराब वातावरण पाहता निवडणुकीची घोषणा होऊ शकते”
अनिल परब पुढे म्हणाले, “ज्या पद्धतीचं वातावरण सध्या आहे त्यावरून काहीही होऊ शकतं. भाजपा-शिंदे गट निवडणूक घ्यायला टाळाटाळ करत आहेत. मात्र, आता समाजातील वातावरण खराबही होत आहे. त्यामुळे आता ते निवडणुकीची घोषणा करू शकतात, असंही वाटत आहे.”
“कुणीतरी जाणीवपूर्वक अशा घटना घडवतंय”
“कुणीतरी जाणीवपूर्वक अशाप्रकारच्या घटना घडवू इच्छित आहे. एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी घडली असेल, तर परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी ती गोष्ट घडवून आणायची आणि त्यावरून जातीय-धार्मिक सलोखा खराब करायचा हे महाराष्ट्राला परवडणारं नाही,” असा इशारा अनिल परब यांनी दिला.
“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न”
“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गृहमंत्रालयाचं नाव खराब होत आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाने यामागे कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे,” असंही परब यांनी नमूद केलं.