भाजपाच्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटातील आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवण्यात आलं असा सचिन अहिर यांचा आरोप आहे. सचिन अहिर यांनी ट्विटरला कार्यक्रमातील व्हिडीओ शेअऱ केला आहे. दरम्यान, भाजपाने मात्र सचिन अहिर यांचा आरोप फेटाळला असून राहुल देशपांडे यांच्या म्हणण्यानुसारच सर्व करण्यात आलं असा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय झालं?

वरळीमधील जांबोरी मैदानात दिवाळीनिमित्त भाजपाकडून ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गायक राहुल देशपांडे आपलं गाणं सादर करत होते. याचवेळी टायगर श्रॉफ कार्यक्रमस्थळी पोहोचला. यामुळे त्याचा सत्कार करण्यासाठी राहुल देशपांडे यांना काही वेळासाठी गाणं थांबवण्यास सांगण्यात आलं असल्याचा आरोप आहे. मंचावर यावेळी भाजपा आमदार मिहीर कोटेचा उपस्थित होते.

सचिन अहिर यांनी व्हिडीओ ट्वीट केला असून, ‘हाच का मराठी कलाकारांचा सन्मान’ अशी विचारणा केली. “मराठी कलाकारांची चेष्टा” असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सचिन अहिर काय म्हणाले आहेत?

सचिन अहिर यांनी यासंबंधी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं की “नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, दहीहंडी तसंच इतर सणांच्या माध्यमातून आपण मराठी माणसांची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं हे दाखवत आहेत. पण या व्हिडीओमुळे यांची खऱ्या अर्थाने मराठी माणूस आणि कलाकरांबद्दल अस्मिता काय आहे हे दिसत आहे. निवडणूका आल्यानंतर अशा गोष्टी करायच्या, पण नंतर कोणत्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं जात नाही”.

“ज्येष्ठ कलाकार गाणं गात असताना दोन वेळा अडवणूक झाल्याने त्यांनीच मला तरी बोलू द्या किंवा तुमचे कार्यक्रम करा असं सांगितलं. टायगर श्रॉफही मुंबईतच मोठा झाला आहे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचं कारण नाही. पण तुम्ही खऱ्या अस्मितेच्या गोष्टी करता आणि अशाप्रकारे कलाकारांचे अपमान करता,” असा संताप सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे. दिलगिरी व्यक्त केली पाहिजे अशी मागणीह त्यांनी केली आहे.

आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

“उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं आणि नाव बदलून घ्यावं. आपलं नाव रडकी सेना ठेवावं. काही झालं तरी रडत असतात. स्वत: काही करायचं नाही, मराठी माणसाशी नाळ नाही, कार्यक्रम करायचे नाहीत आणि अपयश लपवण्यासाठी रडायचं हाच धंदा सुरु केला आहे. सचिन अहिर त्यांचे नेते असून तेच काम करत आहेत,” अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

खरोखरच अपमान झालाय का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “असा कोणताही अपमान झालेला नाही. उलट मराठी माणसाच्या मराठमोठ्या दिपोत्सवात हिंदी कलाकार येत आहेत हा मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. भाजपाकडून मराठी माणसाचा सन्मान होतोय याची कोल्हेकुई सचिन अहिर यांची आहे”

दिलगिरी व्यक्त करा – सचिन अहिर

आशिष शेलार यांच्या टीकेला सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की “स्वत: राहुल देशपांडे यांनी एक तर मला गाऊ द्या, २० मिनिटं सादरीकरणं करतो नंतर तुम्ही हवं ते सोपस्कर करा असं सांगितलं होतं. मी उठून जाऊ का असंही ते म्हणाले होते. मराठीत बोलल्यानंतर मिहीर कोटेचा यांना कळलं नसेल म्हणून त्यांनी इंग्रजीत सांगितलं. पण तरीही नंतर ते मंचावर आले आणि टायगर श्रॉफचा सत्कार करुन गेले. त्यामुळे त्यांनी दिलगिरी तरी व्यक्त करावी. पण त्यांच्याकडून आता ती अपेक्षाही नाही”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray faction mla sachin ahir alleged rahul deshpande disrespected by bjp for tiger shroff in diwali programme sgy