Sanjay Raut on PM Modi’s Education : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीवरून जोरदार हल्ला चढवला आहे. “आमच्या पंतप्रधान मोदींची ही डिग्री बोगस आहे असं लोक म्हणतात. मात्र, मला वाटतं की, ही ऐतिहासिक व क्रांतिकारी डिग्री आहे,” असा टोला संजय राऊतांनी लगावला. तसेच ही डिग्री नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लावावी अशी मागणी त्यांनी केली. राऊतांनी सोमवारी (३ एप्रिल) ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले, “आमच्या पंतप्रधान मोदींची ही डिग्री बोगस आहे असं लोक म्हणतात. मात्र, मला वाटतं की, ‘Entire Political Science’ या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक व क्रांतिकारी डिग्री आहे. ही डिग्री नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लावायला हवी. जेणेकरून लोक पंतप्रधान मोदींच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करणार नाहीत.”
“एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का?”
दरम्यान, संभाजीनगरात आता एकीकडे महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत असताना दुसरीकडे भाजपा आणि शिंदे गटाकडून सावरकर सन्मान यात्रा काढली जात आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “सावरकरांनी या देशाला एक दिशा दिली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. भाजपा, मिंधेगट तो दृष्टीकोन पाळणार असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्त्वाचा संदर्भ दिला.”
“भाजपा म्हणतंय की गाय गोमाता आहे. सावरकरांना ते मान्य नव्हतं. गाय उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर तिचं गोमांस खायला हरकत नाही हा सावरकरांचा विचार होता. हा भाजपाला मान्य आहे का?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.”
“शिंदेंनी आधी आपली दाढी काढावी”
“सावरकरांनी शेडी-जाणव्याचं हिंदुत्व स्वीकारलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेलं आवडत नव्हतं. मग शिंदे दाढी काढणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही. मग कुणीही असो. मग आता डॉ. मिंधे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का? एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे. तुम्ही सावरकरांची विचारयात्रा काढताय. तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलंय का?” असाही प्रश्न संजय राऊतांनी विचारला.
“तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही”
“मिंधे गटानं आधी सावरकर साहित्याचं पारायण करावं. त्यांचं सगळं साहित्य वाचावं. अगदी त्यांनी ब्रिटनमध्ये मदनलाल धिंग्रांबाबत जे विधान केलं आहे, मॅक्झिम गॉर्कीचं साहित्य त्यांनी इंग्रजीतून मराठीत केलं आहे, माझी जन्मठेप, सहा सोनेरी पानं, इतर विज्ञानवादी लिखाण या सगळ्या लिखाणाचं डॉ. मिंधे आणि त्यांच्या ४० लोकांनी पारायण करावं आणि मग त्यांच्या विचारांसाठी सावरकर यात्रा काढावी. भाजपालाही सावरकर विचारांचं पारायण करायची गरज आहे. तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.