शिवसेनेत फूट पडल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) लोकप्रतिनिधींनी पालिका मुख्यालयात धडक दिली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी गाफील असताना अचानक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात प्रवेश केल्यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान शिंदे गट शिवसेन भवनाचाही ताबा घेण्याचा प्रयत्न करु शकतो अशी चर्चा आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं असून त्यांचे बाप आले पाहिजेत असं म्हटलं आहे.
शिवसेना भवनाचा ताबा घेणार अशी चर्चा आहे, असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की “त्यांचे बाप आले पाहिजेत. जर त्यांचा बाप असेल तर येईल. एक बाप असेल तर येतील. हे मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे”.
BMC मध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे : “सत्तेशिवाय समोरासमोर या मग…”; संजय राऊतांचं शिंदे गटाला थेट आव्हान!
मुंबई महापालिकेत ठाकरे-शिंदे गटांत संघर्ष; शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी दोन्ही गटांचा प्रयत्न
“शिवसेना भवनाचा ताबा कोण घेणार? शिवसेना भवन शिवसैनिकांचं असून, बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली वास्तू आहे. ती बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने राहील. ती आमची आहे. अशा घोषणा, वल्गना फार होतात. तुमच्याकडे औटघटकेची सत्ता आहे ती सांभाळा. अशी भाषा वापरलीत तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडेल. आणि जर तुम्हाला वातावरण बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे,” असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
“शिंदे गटाचे पदाधिकारी घुसखोरच”
“शिंदे गटाचे पदाधिकारी घुसखोरच आहेत. त्यांना स्वत:च अस्तित्व नसून, सगळीकडे घुसखोरी करण्यात येत आहे. ही झुंडशाही आणि मस्तवालपणा हा सत्ता असल्यामुळे आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या मग दाखवतो. गद्दारांची जगभरात एक पद्धत आहे, ते कुठेही घुसतात. महापालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत असून, पक्ष एकत्र आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
“महापालिकेतील सर्व पक्षाच्या कार्यालयाला सील करण्यात आलं आहे. कोणत्या कायद्याने सील लावलं गेलं? नोटीस दिली का? ही मनमानी आहे. पक्षाच्या कार्यालयात टाळ ठोकण्यात आलं, हे कोणच्या आदेशाने सुरु आहे. याला कायद्याचं राज्य म्हणत नाही. तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल. तर, ठोकशाहीच्या राज्यात शिवसेनेचं प्रगस्तीपुस्तक चांगल्या मार्काचं आहे. ठोकशाहीत कोणी स्पर्धा करू नका. पालिकेतील कार्यालय शिवसेनेचं राहणार आहे. आयुक्त आणि राज्याचे मुख्यमंत्री काही सूत्रं हालवत असतील तर सावध पावले टाकवीत,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.