महाराष्ट्रात उद्योगासाठी योग्य वातावरण नाही असं टाटाच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं असून त्या अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करण्यास सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अंबादास दानवे उपस्थित होते.
“मी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, टाटाच्या ज्या उच्च अधिकाऱ्याने महाराष्ट्रात वातावरण योग्य नाही सांगितलं त्याचं नाव सांगावं. दादागिरी सत्ताधारी पक्षाकडूनच चालते, आमच्याकडून कोणालाही धोका नाही. या अधिकाऱ्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना उद्योगासाठी चांगलं वातावरण नव्हतं असं सांगितलं हे त्यांनी जाहीर करावं. कारण आम्हाला केंद्र सरकार सांगेल तिथे आम्हाला जावं लागेल असं सांगण्यात आलं होतं,” असं आदित्य ठाकरेंनी ‘टाटा-एअरबस’ प्रकल्पासंबंधी बोलताना सांगितलं.
पुढे ते म्हणाले “हा प्रस्ताव जर सप्टेंबर २०२१ मध्ये झाला असेल तर मग नितीन गडकरी तसंच आम्ही सर्वांनी पत्र का लिहिलं? कदाचित आम्हाला माहिती नसेल पण तुम्ही २०१६ पासून पाठपुरावा करत असाल तर हे तुमचं अपयश आहे. २०१६ ते २०१९ दरम्यान राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार असतानाही नागपूरमधील मिहानमध्ये तुम्ही हा प्रकल्प आणू शकला नाहीत”.
मुख्यमंत्र्यांनाही आव्हान
“खोटं बोलण्याचं नाट्य सुरू असून हे आता संपलं पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी देशात अनेक राज्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे असं म्हटलं आहे. पण स्पर्धेबद्दल बोलायचं गेल्यास महाराष्ट्र कुठे कमी पडतोय का? याबाबत मी चर्चेसाठी त्यांना आव्हान देतो. हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर चर्चेला यावं. तरच मी त्यांचं आव्हान स्वीकारेन,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले आहेत?
“२३ सप्टेंबर २०२१ रोजी टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये होतोय अशी बातमी आली होती. तेव्हा कोणाचे सरकार होते? आम्ही विरोधीपक्षात गेलो की राज्य विसरत नाही. २०१६ साली हा प्रकल्प येत होता, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र दोघेही स्पर्धेत होते. तेव्हा मी म्हणालो होतो की, गुजरातपेक्षा जास्त जागा देऊ. त्यानंतर सराकर बदललं आणि मी विरोधी पक्षात असतानाही टाटाच्या प्रमुखांना माझ्या ‘सागर’ या निवासस्थानी बोलावलं. त्यावेळी त्यांनी इथलं वातावरण उद्योगासाठी योग्य नाही असं सांगितलं’, असा दावा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला.