मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. तसेच त्यांना दिल्लीतील त्यांचं निवासस्थान खाली करण्याची नोटीस लोकसभेच्या हाऊसिंग कमिटीकडून देण्यात आली. दरम्यान, यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे गटानेही मोदी सरकारला लक्ष्यं केलं आहे. नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे, हे हिंदुत्वाच्या संस्कृतीस शोभणारे नाही, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
हेही वाचा – “मी आधीच डॉक्टर झालोय, छोटीमोठी ऑपरेशन…”, डी. लीट पदवी मिळाल्यावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी
ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?
“एका मानहानी खटल्यात राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द व्हावी म्हणून त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर २४ तासांत सरकारने राहुल गांधी यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली. एखाद्यात अतिआत्मविश्वास असू शकतो, पण हा इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा, हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे”, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
“…त्यांना भविष्यात कर्माची फळे भोगावी लागतील”
“इंग्रजांचे जुलमी सरकार भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वीर सावरकर अशा क्रांतिकारकांशी ज्या निर्घृण पद्धतीने वागले, त्याच निर्घृण रीतीने मोदींचे सरकार आपल्या राजकीय विरोधकांशी वागत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही काढून घेतले. हा असुरी आनंद ज्यांना आज झाला आहे, त्यांना भविष्यात कर्माची फळे भोगावी लागतील”, असंही ते म्हणाले.
“अनेक सरकारी बंगल्यांवर भाजपाचा अवैध कब्जा”
“आज संपूर्ण दिल्लीतील अनेक सरकारी बंगल्यांवर भाजप व संघ परिवाराचा अवैध कब्जा आहे. निवृत्त होऊन किंवा पराभूत होऊन कधीच ‘माजी’ झालेल्या भाजप खासदारांनी त्यांचे बंगले सोडले नाहीत. संघ परिवाराच्या संस्था व नेत्यांनी त्यांच्या राजकीय कार्यासाठी सरकारी बंगले मिळवले आहेत, मग राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करताच २४ तासांत त्यांना राहते घर सोडण्याचे आदेश दिले”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.
हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याने विरोधक आक्रमक, लोकसभा अध्यक्षांविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
“हे हिंदुत्वाच्या संस्कृतीस शोभणारे नाही”
“मोतीलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान अतुलनीय होते. पंडित नेहरू त्यांचे राहते घर राष्ट्राला समर्पित केले. त्यांनी त्यांच्या पुस्तकांतून मिळविलेले लाखो रुपयांचे उत्पन्नही सामाजिक कार्यास बहाल केले. १९६५ च्या युद्धानंतर इंदिरा गांधींनी आपले सर्व दागिने सैनिक कल्याण निधीस दान केले होते. अशा नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे, हे हिंदुत्वाच्या संस्कृतीस शोभणारे नाही”, अशी टीकाही ठाकरे गटाने केली.