मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं मुंबईच्या माजी महापौरांना चांगलंच भोवलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) माजी महापौर, दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दत्ता दळवींना न्यायालयात हजर करण्यात आला होतं. तेव्हा, दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

यानंतर प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना दत्ता दळवी म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय. मी केलेल्या वक्तव्याबद्दल वावगं वाटत नाही. कारण, आनंद दिघे यांच्याबरोबर मी काम केलं आहे. आनंद दिघे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटात जो शब्द वापरला, तोच मी बोललो आहे.”

“मला तुरुंगवारी नवीन नाही”

“मी कुठलाही घाणेरडा शब्द वापरला नाही. मी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली नाही. मालवाणी भाषेत भरपूर शिव्या आहेत. त्या ऐकतानाही वाईट वाटेल. तसेच, मला तुरुंगवारी नवीन नाही आहे,” असंही दत्ता दळवींनी सांगितलं.

“दत्ता दळवींचा गुन्हा काय आहे?”

दत्ता दळवींच्या अटकेवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. “दत्ता दळवींचा गुन्हा काय आहे? त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकभावना भांडूपमधील एका मेळाव्यात व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्याबरोबरचे गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. त्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

“एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे”

“खरं म्हणजे गद्दार हृदयसम्राटांनी स्वतःला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेणं वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्यासाठी खरं म्हणजे एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही. मी एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी संजय राऊतांनी केली.

“त्यात ते काय चुकीचं बोलले आहेत?”

“एकनाथ शिंदे वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू हृदयसम्राट ही पदवी स्वतःला लावून घेत आहेत. यावर दत्ता दळवींनी शिवसैनिक म्हणून त्या सभेत जोशपूर्ण भाषण केलं. ते असे म्हणाले की, ‘आनंद दिघे असते, तर या गद्दार हृदयसम्राटांना चाबकाने फोडून काढलं असतं.’ त्यात ते काय चुकीचं बोलले आहेत?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.