तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला मुंबईतल्या मुलुंड या भागात घर नाकारलं गेल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनीच पोस्ट केलेल्या व्हायरल व्हिडीओमुळे समोर आला आहे. त्यानंतर मनसेने त्या ठिकाणी धाव घेत आपल्या स्टाईलने इंगा दाखवला. या महिलेची सदर सोसायटीच्या सेक्रेटरीने आणि इतरांनी माफी मागितली आहे. मात्र या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर रंगली आहे. तसंच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांवर कारवाई केली जाणार की दिल्लीश्वरांपुढे हे सरकार हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरेंची X पोस्ट (ट्विटर) काय?

चीड आणणारी घटना… पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार? आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या. तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार? ह्या बिल्डींगवर कारवाई होणार का? उद्या BMC आणि पोलीस पाठवणार का? की ‘थँक यू’ म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार?
हिम्मत करा!
कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा!
महाराष्ट्र बघतोय!
अतिशय संतप्त करणारी ही घटना!

नेमकी काय घडली घटना?

मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात मराठी माणसाला घर देणार नाही असं म्हणणाऱ्यांना मनसेने आता चांगलाच दणका दाखवला आहे. तसंच संबंधित व्यक्तींना माफी मागायला लावी असून या पुढे असं करणार नाही असंही मनसेने वदवून घेतलं आहे. तृप्ती देवरुखकर या महिलेने त्यांना आलेला घर घेण्याबाबतचा अनुभव हा त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. ज्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर मनसेने तातडीने संबंधित सोसायटीमध्ये धाव घेत आपल्या स्टाईलने मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांना इशारा दिला. ज्यानंतर या लोकांनी माफी मागितली आहे.

हे पण वाचा- धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

तृप्ती देवरुखकर यांनी व्हायरल व्हिडीओत त्यांनी काय म्हटलं?

“जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकीय वापर करणं बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं सांगितलं. नियमावली मागितली तर धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत हात पकडला आणि माझ्या पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीत परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही तर संताप आहे. आज मला जो अनुभव आला तो किती मराठी माणसांना आला असेल? किती जणांना घरं नाकारली गेली असतील?” असे प्रश्न विचारत तृप्ती देवरुखकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला. जो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी या सोसायटीत पोहचले. त्यांनी इशारा दिल्यानंतर या सोसायटीतल्या लोकांनी माफी मागितली. यानंतर आता मनसेने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group mla aditya thackeray ask questions to eknath shinde on mulund marathi woman viral video gujrati man denied house scj
Show comments