ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारवर रस्त्यांच्या कंत्राटावरुन कडाडून टीका केली आहे. भाजपा प्रणित हे सरकार जाणार आहे. महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा आमचंच सरकार येणार आहे. मिंधे सरकारने आत्तापर्यंत दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे जनता महाविकास आघाडीला कौल देईल असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्हाला खात्री आहे आमचं सरकार येणार. सगळीकडे तसं वातावरणही आहे. आमचं सरकार आल्यानंतर ज्यांनी चुकीचं काम आणि भ्रष्टाचार केला असेल त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. २२ कोटींचं पेमेंट कॉन्ट्रॅक्टरला करण्यात आलं आहे. अशा गोष्टी झाल्याचं समजतं आहे. अशा गोष्टी आपल्याकडे व्हायलाच नको.
कर्नाटकातलं भ्रष्ट सरकार जनतेने घालवलं, मध्य प्रदेशातलं सरकार जाईल कारण जनताच त्यांना उत्तर देईल. तसंच महाराष्ट्रातलंही भाजपा प्रणित खोके सरकार जनता घालवल्याशिवाय शांत राहणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमचं काम लोकांसमोर आहे. दक्षिण मुंबईचा जो कंत्राटदार आहे तसे चार कंत्राटदार आहे. त्यांच्याकडून जो दंड घेतला जाणार आहे तो महापालिकेने पैसे दिल्यावर घेतला जाणार आहे. मग तुम्ही कुणाच्या खिशातून हे पैसे काढत आहात? जनतेच्याच ना? खरंतर हा दंड कंत्राटदाराने त्यांच्या खिशातून भरला पाहिजे. मुंबईकरांचा रस्त्यांचा प्रश्न जसा मोठा आहे.
आणखी एक मोठा प्रश्न आहे तो प्रदूषणाचा. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सर्दी खोकल्याचा त्रास होतो आहे. यावर काय उपाय होतो आहे? महाराष्ट्राला पर्यावरण मंत्रीही नाहीत. कारण पर्यावरण मंत्री म्हणून कुणी उत्तरही देत नाही. मुंबईत धुरकं दिसू लागलं आहे. विविध कारणं दिली जातात मात्र ती कारण खोटी आहे. आम्ही मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लान बनवला होता. मात्र जे काही बांधकाम सुरु आहे त्यामुळे मुंबईत धूळ होते आहे. ही धूळ मुंबईकरांना त्रास देते आहे. नगरविकास मंत्र्यांना बहुदा त्यांना त्यांचं खातं कसं सांभाळायचं हे माहीत नाही. आम्ही आमच्या कार्यकाळातही कामं केली आहेत मात्र तेव्हा असं होत नव्हतं. कारण आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम करत होतो. आत्ताचं सरकार ते करताना दिसत नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.